पुण्यातील लोहगाव-वाघोली रस्ता खड्डेमय; वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, नागरिक त्रस्त | पुढारी

पुण्यातील लोहगाव-वाघोली रस्ता खड्डेमय; वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, नागरिक त्रस्त

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : लोहगाव-वाघोली रस्ता, धानोरी रस्ता, वडगाव शिंदे रस्ता आणि निरगुडी रस्त्यावर सध्या पावसामुळे अनेक खड्डे पडले आहेत. यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोहगावचा महापालिकेत समावेश होऊन पाच वर्षे उलटली. मात्र, परिसरातील रस्त्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. लोहगाव-वाघोली रस्ता हा कागदोपत्री 100 फूट रुंदीची असताना प्रत्यक्षात तो अरुंद आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमणे झाली आहेत. त्यातच पावपावसामुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. स्मशानभूमी, ओझोन बिल्डिंग, संतनगर, दादाची वस्ती, कर्मभूमीनगर या परिसरात सध्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बस स्थानक परिसरातदेखील मोठे खड्डे पडले असून, त्यात सध्या पावसाचे पाणी
साचले आहे.

वडगाव शिंदेकडे जाणारा रस्ता जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरदेखील खड्डे पडले आहेत. धानोरी रस्तादेखील खोदण्यात आला होता. मात्र, त्याच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत.
निरगुडी रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. लोहगाव परिसरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिक व वाहनचालक त्रस्त आहेत. संतनगर परिसरात होणार्‍या सततच्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.

या ठिकाणचे महापालिकेने खड्डे बुजवावेत, तसेच विमानतळ वाहतूक विभागाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वाहतूक विभागाकडून या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात या जागेवर पोलिस दिसत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. विमानतळ वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक ईडकर म्हणाले की, वाहतूक नियोजन करण्यासाठी संतनगर या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आला आहे.

येरवडा येथील डांबर प्लांट बंद असल्याने खड्डे बुजवण्याच्या कामात अडथळा येत आहे. डांबर मिळेल तसे प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येत असून, नागरिक व वाहनचालकांची गैरसोय दूर केली
जात आहे.

– सुनील पोपळे,
कनिष्ठ अभियंता, पद विभाग, महापालिका

हेही वाचा

रत्नागिरी : कोकण किनारपट्टी भागात उघडीप

कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेते उद्या दिल्लीला

गोवा : संगमेश्वर नदीत कार कोसळून माय-लेकास जलसमाधी

Back to top button