Amarsingh Patil Suspension News
पुणे: मोजणीमध्ये गोंधळ करणे, कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांशी अरेरावीपणे बोलणे, त्याचप्रमाणे कोणत्याही कामासाठी लाच मागणे, याबरोबरच पुण्यातील एका व्यापार्याला हडपसर येथील मोजणीसाठी पन्नास लाख रुपयांची लाच मागणारा पुण्यातील हवेलीतील भूमिअभिलेख विभागातील उपअधीक्षक अमरसिंह पाटील याला अखेर निलंबित करण्यात आले आहे.
कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागाने कारवाई केली असून, त्याच्या निलंबनाचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव अश्विनी यमगर यांनी शुक्रवारी काढले आहेत.
भूमिअभिलेख विभागाच्या पुण्यातील हवेली या विभागात अमरसिंह पाटील हा उपअधीक्षक या पदावर कार्यरत होता. शिरस्तेदार, भूकरमापक तसेच वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून बिनधास्तपणे कोणत्याही प्रकरणात लाच दिल्याशिवाय काम न करणे, अशी त्याची ख्याती होती.
याबरोबरच कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी गैरवर्तन करणे, अरेरावीपणे बोलणे, मालमत्तेच्या मोजणीत अफरातफर करणे, लाच दिल्यावर लागलीच मोजणीची तारीख बदलणे, मोजणीमध्ये बदल करणे, अशी बेकायदा कामे करीत होता. दरम्यान, पुण्यातील एका व्यापार्याकडे लाच मागण्याच्या प्रकरणावरून फसवणुकीवरून ‘भूमिअभिलेख’चे वरिष्ठ अधिकार्यांनी याची प्रकरणाची दखल घेऊन निलंबनाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला होता.
‘हेलिकॉप्टर लावीन’ची धमकी पडली महागात
पुण्यातील एका व्यापार्याची हडपसरमधील जमिनीची मोजणी करण्यासाठी पन्नास लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच रक्कम न दिल्यास ‘हेलिकॉप्टर लावीन’ या सांकेतिक भाषेत धमकी देखील दिली होती. याप्रकरणी संबंधितांनी थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन येरवडा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
तपासणीचे काम सुरू, तरीही पदोन्नती
पुणे जिल्ह्याचे भूमिअभिलेख विभागाचे अधीक्षक यांनी त्यांच्या कार्यकाळात देखील अनेक कारनामे केले आहेत. त्यामध्ये निकाल बदलणे, मोजणीचे क्रमांक बदल्यासाठी मोठमोठी रक्कम घेणे. यासह इतर अनेक तक्रारी महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे आल्या आहेत. त्यानुसार मोरे यांच्या कार्यकाळातील कागदपत्रांची तपासणीसाठी कमलाकर हट्टेकर समिती नेमली आहे. मात्र, अजून तपासणीचे काम सुरूच आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सूर्यकांत मोरे यांची पदोन्नती झाली असून, ते सध्या उपसंचालक या पदावर भूमिअभिलेखच्या पुणे मुख्यालयात कार्यरत आहेत.