पुणे: राज्यात कृषिमंत्र्यांबद्दल सारखं काहीतरी, काहीतरी, काहीतरी निघतेय. त्यामुळे असा कृषिमंत्री शोधून काढतो की, काही निघालेच नाही पाहिजे. मला कोणताही वाद नको होता, म्हणून मी कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांना शोधले, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमात करताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व द्राक्ष संघाचे पदाधिकारी आणि राज्यातील द्राक्ष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या वेळी पवार बोलत होते. (Latest Pune News)
पवार म्हणाले, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे मोठे शेतकरी म्हणून गणले जातात आणि कष्टातून पुढे आले आहेत. त्यांचे वडील आणि त्यांच्या काकांनी चांगली शेती केली आहे. त्यांची उत्तम प्रकारची शेती असून, सर्व कुटुंब, परिवार, नातेवाईक त्यामध्ये राबतात. मोठ्या प्रमाणात द्राक्षे, केळी, डाळिंब पिके घेतात. ऊस शेतीही चांगली करतात. 15 ते 20 हजार टनाइतका ऊस त्यांचा कारखान्याला जातो. तरीसुद्धा कृषिमंत्री म्हणून भरणे यांच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत. कृषिमंत्री मोटरसायकलवर बसून जातात हेसुद्धा आवर्जून पाहिले जाते, असे
ते म्हणाले. सार्वजनिक गणेशोत्सव राज्यउत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. आनंदात, उत्साहात आणि प्रत्येकाच्या मनाला अतिशय समाधान देणार्या पद्धतीने तो चांगला साजरा व्हावा, अशी काळजी आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून घेतल्याचेही ते म्हणाले.
छोट्याशा सभागृहातून तुम्ही आले ‘टिप-टॉप’मध्ये
द्राक्ष उत्पादकांमुळे राज्यात समृद्धी आलेली आहे. मी अनेक वर्षे संघाच्या वार्षिक अधिवेशनास उपस्थित राहिलो आहे. सुरुवातीच्या सभा डेक्कन जिमखान्यावर छोट्याशा सभागृहात बसत. नंतर मार्केट यार्डात, निसर्ग मंगल कार्यालयात पोहोचला आणि आता टिप-टॉप हॉटेलमध्ये आलो आहोत... असे पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला.
राज्याच्या भल्यासाठी म्हटलं की मार्ग निघतो
मी राज्य सरकारमध्ये विविध मंत्री म्हणून 35 वर्षे काम करीत आहे. आमच्या प्रशासनाला कळलं ना की, त्यांच्याकडून तो विषय व्यवस्थित कायद्यात बसवितात. मंत्रालयाकडून एखाद्या विषयाला कशी काट मारायचं म्हटले की, ते बरोबर उणिवा काढतात. मात्र, राज्याच्या भल्यासाठी मार्ग काढायचा म्हटल्यास ते बरोबर मार्ग काढतात, असेही पवार म्हणाले.