Extra staff at metro stations for crowd control
पुणे: यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुणे मेट्रोने कंबर कसली असून, मध्यवस्तीतील मेट्रो स्थानकांवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विशेष नियोजन केले आहे. या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मंडई आणि कसबा या प्रमुख स्थानकांवर मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांसोबतच अतिरिक्त पोलिस बळ तैनात करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक (आयएएस) श्रावण हर्डीकर यांनी पोलिस उपायुक्त कृषिकेष रावले यांच्यासोबत मंडई आणि कसबा मेट्रो स्थानकांसह स्थानक परिसराची पाहणी केली. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकार्यांनी दिल्या. (Latest Pune News)
गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोला मिळणारा प्रतिसाद पाहता, प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित करणे हे यावेळी करण्यात आलेल्या पाहणीचे उद्दिष्ट होते. या पाहणीवेळी मेट्रोचे संचालक विनोदकुमार अग्रवाल, कार्यकारी संचालक तथा महाव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनावणे यांच्यासह पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात मध्यवस्तीत ये-जा करणार्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते. त्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आम्ही विशेष तयारी केली आहे. मंडई आणि कसबा या स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी आमच्याकडे असलेले अतिरिक्त मनुष्यबळ आणि अतिरिक्त पोलिस दल तैनात केले जाईल. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आम्ही स्थानक व्यवस्थापकांना दिल्या आहेत. पुणेकरांनी निर्धास्तपणे मेट्रोने प्रवास करून गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा.
- डॉ. हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक तथा कार्यकारी संचालक, महामेट्रो