पुणे

उपमुख्यमंत्र्यांनी ससूनचे टोचले कान; अजित पवारांच्या सवालाने प्रशासन वरमले

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'बीजे वैद्यकीय महाविद्यालयात  31 डिसेंबर रोजी रात्री निवासी डॉक्टरांनी मद्यपान करून गोंधळ घातला. अशा घटनांमुळे रुग्णालयाकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन बदलतो. याआधीही एका व्यक्तीमुळे ससूनचा नावलौकिक वाढला, ही बाब पुणेकरांसाठी भूषणावह नाही. येथे खालपासून वरपर्यंत कीड लागली आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ससून प्रशासनाचे कान टोचले. कायदा-सुव्यवस्था अडचणीत येऊ नये, यासाठी सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून काम केले पाहिजे, अशी खरमरीत सूचनाही त्यांनी केली.
बी. जे. महाविद्यालयाच्या मैदानाचे नूतनीकरण, न्यायवैद्यकशास्त्र नूतन इमारत, 570 खाटांची 11 मजली नूतन इमारत, तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष व बाह्यरुग्ण विभाग, रक्तपेढी नूतनीकरण, पेट अँड स्पेक्ट्स अत्याधुनिक तपासणी केंद्र, न्यूरोसर्जरी विभाग, नव्याने कार्यान्वित करण्यात आलेला इमर्जन्सी मेडिसीन विभाग, इंटरव्हेशन रेडिओलॉजी विभाग अशा विविध विकासकामांचे उदघाटन शुक्रवारी अजित पवार यांच्या हस्ते ससून रुग्णालयात झाले. या वेळी त्यांनी ससून रुग्णालयाशी संबंधित विविध मुद्द्यांवर टिपण्णी केली.
 या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार रवींद्र धंगेकर, डॉ. विनायक काळे, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसकर, सचिव दिनेश वाघमारे, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे आदी उपस्थित होते. माजी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचा उल्लेख न करता पवार म्हणाले, 'ससूनमधील चुकीच्या प्रकाराविरोधात आमदार धंगेकर यांनी ठामपणे आवाज उठवला. कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ नये, यासाठी सर्वांनी भान ठेवून काम केले पाहिजे. राज्यकर्ते अशा चुकीच्या गोष्टी करायला कधीच सांगत नाहीत. ससूनमधील वरिष्ठ अधिका-यांनी याकडे गांभीर्याने पहायला हवे.'
कोरोना काळात ससूनने जनतेला मोठा आधार दिला. ससूनमधील पायाभूत सुविधा आणि रुग्णसेवा अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर,छत्रपती संभाजीनगर या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे प्रमाण वाढवणे आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
– हसन मुश्रीफ,  वैद्यकीय शिक्षणमंत्री
ससून रुग्णालयावरील ताण
दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सुविधा, जागा आणि अत्याधुनिक उपकरणे वाढवण्याची गरज आहे. ससूनच्या बाजूलाच रस्ते विकास महामंडळाची जागा आहे. याबाबत दादा भुसे यांच्याशी बोलू आणि ससूनला जागा मिळवून देऊ. त्या जागेमध्ये कॅन्सर हॉस्पिटलसाठी प्रयत्न करु.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री

एवढ्या कमी पगारात क्लार्कही मिळत नाही

पवार पुढे म्हणाले, "शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. कंत्राटी डॉक्टरांना केवळ 60 हजार रुपये वेतन दिले जाते. एवढ्या कमी पगारात क्लार्कही मिळत नाही; चांगले डॉक्टर कसे मिळणार', असा सवाल उपस्थित करत, 'निधी द्यायचे काम मी करेन, मनुष्यबळ वाढवण्याचे काम तुम्ही करा. गोरगरिबांच्या उपचारांमध्ये विलंब होता कामा नये. समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळायला हव्यात.'

एक महिन्यात सर्वेक्षण करण्याच्या सूचना

पवार म्हणाले, 'ससूनमधील सुविधांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. येथे कोणत्या सुविधा गरजेच्या आहेत, काय वाढवावे, कमी करावे, काय दुरुस्त करावे, याचा अभ्यास केला पाहिजे. एका महिन्याच्या आत आढावा घेऊन कामामध्ये शिस्त आणा आणि नियोजन करा. त्याप्रमाणे गरजेप्रमाणे येत्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करता येईल.'
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT