बारामती: माळेगाव कारखाना निवडणूक काळात बारामतीतील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा उघडी असल्याच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्याला रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. कुणी काहीही मागणी केली तर मी त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
बारामतीतील प्रशासकीय भावनातील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून सहकार बचाव पॅनल ने आरोप केले होते. त्यावर पवार म्हणाले, आमच्या नीलकंठेश्वर पॅनलचा एकही व्यक्ती बँकेत नव्हता. (Latest Pune News)
ज्या दिवसापासून आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून माळेगावात शरद सहकार संकुल मध्ये त्यांचा अड्डा आहे. पण मी त्यात पडलो का? ज्याचे त्याला लख लाभ. मला त्यात पडायचे नाही. आता सुद्धा तेथे लोक बसलेले असतील.
सहकाराच्या नियमात आचारसंहितेच्या काळात कोणालाही तेथे बसता येत नाही. तेथे बसून प्रचार करता येत नाही. याद्या करता येत नाहीत. काल रात्री सुद्धा तिथं बसूनच राजकारण चाललं होतं. मला रात्री फोन आला. तिथे स्कॉड पाठवा. बघा काय होतं ते. पण ज्याचं त्याला लख लाभ. जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा मी वर्ष दीड वर्षांपूर्वीच राजीनामा दिला आहे त्यामुळे माझ्या नेतृत्वात बँक चालते हे कसे काय असेही उत्तर अजित पवार यांनी दिले.
नेहमीप्रमाणेच माध्यम प्रतिनिधी वर भडकले
उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने कारखान्याचे चेअरमन होण्याच्या प्रश्नावर नेहमीप्रमाणे अजित पवार माध्यम प्रतिनिधी वरच भडकले. मी चेअरमन पदाचा उमेदवार आहे तुला काय त्रास आहे का? असा सवाल त्यांनी केला. मी 35 वर्षे इथे काम करतो आहे. मीडियाने दाखवले नसते तर माळेगावच्या निवडणुकीची इतकी चर्चा झाली नसती असेही ते म्हणाले.
पालख्यांची व्यवस्था उत्तम
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वादाबद्दल उपमुख्यमंत्री म्हणाले, शासन शासनाची भूमिका पार पाडत असते. वर्षांनो वर्ष चालत आलेली वारीची परंपरा आहे. आम्ही फक्त नियंत्रण ठेवण्याचे काम करत असतो. शासनाचे वेगवेगळे विभाग यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडतात. शासनाच्याही अनेक दिंड्या यात सहभागी होतात.
पालखी सोहळ्या संबंधी मुख्यमंत्र्यांसह अन्यमंत्र्यांनीही बैठका घेतल्या आहेत. सरकारी यंत्रणेने त्यांचे काम केलं आहे. चौदाशे दिंड्यांना प्रत्येकी 20000 रुपये दिले आहेत. विविध ग्रामपंचायतींना खर्चासाठी अनुदान दिले आहे. पुणे महानगरपालिका आर्थिक बाबतीत सक्षम आहे. मी मतदान संपल्यावर मुंबईला जाणार आहे. 30 जून ला पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यासाठी उद्यापासून माझ्या बैठका सुरू होत आहेत.
सत्य असेल तर तटकरेंची चौकशी होईल
मंत्री आदिती तटकरे यांच्यावरील आरोपाबाबत पवार म्हणाले, सत्य असेल तर चौकशी होते आणि वस्तुस्थिती उघड होते. राजकीय जीवनात काम करताना अनेकांवर आजवर आरोप झाले आहेत. चौकशीनंतर वस्तुस्थिती लोकांसमोर आली आहे. महिला बालविकास विभागाचे ती व्यवस्थित काम करत आहेत. तिला मुद्दाम ओढण्याचे काम केलं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतील आम्ही तिघेजण एकत्र बसून निर्णय करू असे पवार म्हणाले. भरत गोगावले यांच्या संबंधित प्रश्न विचारला असता पवार यांनी उत्तर देणे टाळले.