पुणे: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती; तर घरकुल, लखपती दीदी, जलजीवन मिशन, सामुदायिक बायोगॅस, अशा विविध योजनांचा आढावा घेतला. तसेच बांधकामाचा दर्जा हा सार्वजनिक बांधकामाच्या धर्तीवरच राखला जावा, अनावश्यक औषधे खरेदी करू नका, जिल्हा कुपोषणमुक्त करा आदी सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.
शिवस्वराज्यगुढी उभारणे, कोविड योद्धा स्मारकाचे लोकार्पण कार्यक्रमासाठी ते जिल्हा परिषदेत आले होते. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात आदी उपस्थित होते. (Latest Pune News)
या वेळी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या ‘ई संचित’ तसेच महिला व बालकल्याण विभागाची अंगणवाडी सेविका भरतीसाठी ‘सखी सहेली’ या वेबसाईटचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्ह्यातील बांधकामांच्या निविदा ऑफलाइन पद्धतीने न करता ‘10 लाखांपर्यंत आणि त्या पुढील कामांच्या निविदा आता ‘ई’ पद्धतीने काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ‘ब्रिटिशांच्या पद्धतीने दीर्घकाळ टिकणारी बांधकामे करा.
25 वर्षांत एकाच कामाचे दोनदा उद्घाटने करायला बोलवू नका’, अशा शब्दांत अजित पवार यांनी प्रशासनाला कानपिचक्या दिल्या. ‘अनावश्यक औषधे खरेदी करू नका. जी आवश्यक आहेत तीच औषधे पुरेशी प्रमाणात खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पुणे जिल्ह्यात कुपोषित बालके असता कामा नये, अशाही सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
अंगणवाड्या बांधण्यासाठी प्रत्येकी 11 लाखांचा निधी मंजूर करण्यात येतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर 11 ऐवजी 15 लाखांचा निधी उपलब्ध करून देऊ. त्याबाबत जिल्हा परिषदेने महिला व बालकल्याण विभागामार्फत प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.