पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरीत; दिव्यांग भवनाचे होणार उद्घाटन

Laxman Dhenge

पिंपरी : मोरवाडी, पिंपरी येथील महापालिकेच्या दिव्यांग भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाशेजारील उभारलेले विद्यार्थी निवासस्थान इमारत आणि काही प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.9) दुपारी 2 वाजता करण्यात येणार आहे. नाशिक फाटा, कासारवाडी येथील एसटीपीतील घरगुती घातक कचराप्रक्रिया केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यानंतर वायसीएम रूग्णालयातील डॉक्टर विद्यार्थी यांच्या निवासस्थानाचे उद्घाटन केले जाणार आहे.

त्यानंतर मोरवाडी येथील दिव्यांग भवनाचे उद्घाटन होणार आहे. त्याचप्रमाणे, वाकड येथील बॅडमिंटन कोर्टचे भूमिपूजन, डी मार्ट, काळेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनसाठी उभारण्यात आलेले ट्रान्सफर स्टेशनचे उद्घाटन केले जाणार आहे. आनंदनगर, सांगवीतील नूतनीकरण केलेल्या जलतरण तलावाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान येथे यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई कामाची सुरुवात त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी गुरुवारी (दि.8) दिली.

निगडी-रावेत उड्डाणपुलाचे उद्घाटन वगळले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निगडी ते रावेत उड्डाण पुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. महापालिकेने एकूण आठ कामांची यादी तयार केली होती. त्याबाबत सादरीकरणही तयार करण्यात आले. हा मार्ग वाहतुकीस खुला करा, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, अंतिम कार्यक्रम पत्रिकेत या उड्डाण पूल उद्घाटन कार्यक्रमाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगली आहे. त्या पुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा आग्रह स्थानिक पदाधिकार्‍यांनी धरला आहे. त्यामुळे तो कार्यक्रम वगळला असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT