पुणे: येत्या तीन वर्षांत देशातील लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता आहे. 2026, 2027 आणि 2028 मध्ये लोकशाही किती टिकेल, हा खरा प्रश्न आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी शनिवारी (दि. 17) व्यक्त केले. राष्ट्र हे स्वतःला भरारी घेण्यासाठीचे आकाश आहे, असेही त्यांनी नमूद केले. अमेरिकेमध्ये स्थापन झालेल्या सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य आणि समाजकार्य पुरस्कारांचे वितरण डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक - चित्रपट दिग्दर्शक अरुण खोपकर यांना दिलीप वि. चित्रे स्मृती जीवनगौरव पुरस्कार तर नागपूर येथील लीला चितळे यांना समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. वयोमानामुळे प्रत्यक्ष उपस्थित नसलेल्या चितळे यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कार कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीत आणि त्यांचे मनोगत दाखविण्यात आले. याच कार्यक्रमात निखिलेश चित्रे, विनय नारकर, ऋत्विक व्यास यांना साहित्य तर, प्रा. जावेद पाशा आणि दत्ता देसाई यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान केले. पश्चिम बंगाल येथील कार्यकर्ते मनीष राय चौधरी यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. साधना ट्रस्टचे विनोद शिरसाठ, मासूम संस्थेच्या मनीषा गुप्ते आणि पुरस्कार निवड समिती समन्वयक मुकुंद टाकसाळे या वेळी उपस्थित होते.
जगातील किती देशांत लोकशाही टिकतील? यासंबंधीच्या जागतिक अभ्यासाचा संदर्भ देत डॉ. देवी म्हणाले, देशाच्या संसदेने जातवार जनगणना करण्याचे विधेयक संमत केले आहे. जनगणनेला न्यायालयात आव्हान देता येत नाही हा कायदा आहे. आता 543 खासदार आहेत. जनगणना झाल्यानंतर लोकसंख्या वाढीनुसार खासदार संख्या निश्चित होईल. नव्या संसद भवनात 800 खासदार बसतील, अशी रचना आधीच करण्यात आली आहे.
त्यामुळे विरोधी पक्षांसाठी पुरेशी जागा उरणार नाही. नागरिकत्वाची नवी व्याख्या थोपविण्याचे काम सुरू असताना महाराष्ट्र फाउंडेशनच्या कार्याची इतिहासामध्ये दखल घेतली जाईल. महापालिका निवडणुकीच्या निकालांसंदर्भात ‘एका निवडणुकीने काही बिघडत नाही. ‘राज्यघटना सलामत तो इलेक्शन पचास’, अशी टिप्पणी डॉ. देवी यांनी केली.
खोपकर म्हणाले, हा पुरस्कार साहित्यातील योगदानाबद्दल दिला गेला असला, तरी मी व्यवसायाने साहित्यिक नाही आणि वृत्तीनेही नाही. मी प्रथम चित्रपटदिग्दर्शक आहे. मी वृत्तीने साहित्यिक नाही, याचा अर्थ मला साहित्यात रस नव्हता असे मात्र मुळीच नाही. महाराष्ट्रात विद्वानाचे किंवा साहित्यिकाचे वर्णन करताना नेहमी त्याच्या वाचनाचा उल्लेख येतो. विशेषत: इंग््राजीतल्या वाचनाचा. जितकी वाचलेली पुस्तके जास्त तितकी विद्वत्ता जास्त. एखाद्या व्यक्तीने किती कला अनुभवल्या, किती भाषा, संस्कृती, संगीत, नृत्यशैली जाणल्या, जग किती पाहिले आणि विविध कलांवर प्रेम करण्याची त्याची क्षमता किती आहे, याचा विचार क्वचितच केला जातो. हे बदलले, तरच संस्कृतीत सकारात्मक परिवर्तन घडेल.