भिगवण: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील दुय्यम मासळी बाजरातील भुगा (लहान मासळी) माशांच्या दुर्गंधीमुळे भिगवण, तक्रारवाडी परिसरातील नागरिक, व्यापारी, डॉक्टर, दुकानदार, व्यावसायिक कमालीचे हैराण झाले आहेत. ही दुर्गंधी सडलेल्या जनावरांपेक्षाही भयानक आणि सहनशीलतेच्या पलीकडे गेली असून, आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या भुग्याच्या दुर्गंधीमुळे चांगला मासळी बाजारदेखील बदनाम होऊ लागल्याने भुगा गावाबाहेर व निर्जन भागात घालवा, अशी मागणी जोर धरत आहे.
वास्तविक भिगवणचा मासळी बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. या मासळी बाजारात हावडा, कलकत्ता, पुणे, सातारा, सोलापूर, बारामती आदी जिल्हे व तालुक्यातील व्यापारी व ग्राहक मासळी खरेदीसाठी गर्दी करतात. यातील आर्थिक उलढालीमुळे बेरोजगारांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे, तसेच भिगवण मासळीबाहेरची उलाढाल ही भिगवण अर्थकणा मनाला जातो.
मात्र, उजनीत अवैधरीत्या पकडलेला व भुगा नावाने ओळखला जाणार्या लहान माशांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा भुगा रत्नागिरी, तळोजा यासह महाराष्ट्र व राज्याबाहेर फिश मिल कंपन्यांना पाठवला जातो. साहजिक त्या भुगा मासळीची गुणवत्ता राखायची नसते, प्रक्रिया करायची नसते, बर्फ (आयसिंग) जास्त लावण्याची गरज भासत नाही.
त्यामुळे हे लहान मासे सडण्याची प्रक्रिया वेगात होते आणि त्याची तसेच सडलेल्या माशांचे पाणी इथेच सांडते. त्याची असहाय्य दुर्गंधी सुटते आणि वार्यामुळे गावभर पसरत आहे. यासह भुगा वाहून नेणारी वाहने, बॉक्स व्यवस्थित धुतले जात नाहीत. संबंधित ठिकाणी डेटॉलचा वापर केला जात नाही. स्वच्छतेचा प्रचंड अभाव असल्याने दिवसरात्र दुर्गंधी पसरत आहे. (latest pune news)
बरं ही दुर्गंधी अशी-तशी नाही अगदी किती जरी नाक-तोंड दाबले तरी ती येतच राहते. अगदी उलट्या होतात एवढी भयानक परिणाम या दुर्गंधीचा आहे. या भागातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, दुकानदार, दवाखान्यातील रुग्ण, डॉक्टर, बाजारहाटसाठी येणारे नागरिक असे सर्व क्षेत्रातील नागरिक या दुर्गंधीला वैतागून गेले आहेत. त्यामुळे कर आकारणी करणारी व सर्वस्वी जबाबदार बाजार समितीने यावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीनेदेखील आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने लक्ष देण्याची गरज आहे
भुग्यामुळे मासळी बाजार बदनाम
या भुग्याची दैनंदिन हजारो टन आवक या आवारात होते. वास्तविक भिगवणचा मासळी बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. उजनीतील मासे राज्य, राज्याबाहेर तसेच मोठ्या शहरात, ग्रामीण भागात विक्रीसाठी नेले जातात. यामध्ये त्याची गुणवत्ता राखली जाते, त्याचे आयसिंग केले जाते, व्यवस्थित बॉक्समध्ये पॅकिंग केले जाते. त्यामुळे या चांगल्या माशांमुळे दुर्गंधी सुटण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, भुग्यामुळे हा चांगला मासळी बाजारही बदनाम होत आहे.
जबाबदारी बाजार समितीची
मासळी कृषी उत्पन्न बाजार समिती करआकारणी करते. त्यामुळे त्या ठिकाणी सर्व सेवा-सुविधा देण्याची व स्वछता राखण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. भुगा माश्याचे पाणी मातीत मुरत असल्याने त्याची दुर्गंधी जास्त सुटते. त्यासाठी दैनंदिन डेटॉल, फिनेल किंवा इतर उपाययोजना केल्यास व स्वछता राखल्यास दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार आहे.