Sant Tukaram Pudhari
पुणे

Sant Tukaram Palkhi Dehu Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2026; आषाढी वारीची तयारी अंतिम टप्प्यात

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला 7 जुलै रोजी देहूगाव येथून प्रारंभ होणार असून आषाढी वारीसाठी प्रशासन व देवस्थानची जोरदार तयारी सुरू

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याला यंदा 7 जुलै रोजी श्रीक्षेत्र देहूगाव येथून भक्तिमय वातावरणात प्रारंभ होणार आहे. श्रीक्षेत्र देहू देवस्थान संस्थानच्या वतीने या भव्य सोहळ्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

परंपरेनुसार सकाळी धार्मिक विधी, पूजा- अर्चा आणि कीर्तनाच्या मंगल वातावरणात पालखीचे प्रस्थान होणार असून, हजारो वारकरी, भाविक आणि दिंड्या “ज्ञानोबा- तुकोबा”च्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. देहू ते पंढरपूर हा पालखी सोहळा सुमारे तीन आठवड्यांचा असून, मार्गातील विविध ठिकाणी विसावा, आरती आणि मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे.

पालखीचा पहिला मुक्काम देहूनंतर विविध पारंपरिक ठिकाणी होणार असून पुढे आकुर्डी, श्री निवडुंगा विठ्ठल नाना पेठ पुणे, हडपसर, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उंडवडी, बारामती शारदा विद्यालय, सणसर निमगाव केतकी, इंदापूर, सराटी पालखी तळ (नीरा स्नान) अकलूज, बोरगाव श्रीपूर, पिराची कुरोली, वाखरी आदी मार्गे पालखी शनिवारी (दि. 25 जुलै) श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी गोल रिंगण, पादुका पूजन, तसेच कीर्तन-भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, पुण्यातील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर येथे संपूर्ण दिवस पालखीचा मुक्काम राहणार असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. शेवटच्या टप्प्यात वाखरी मार्गे पालखी पंढरपुरात प्रवेश करणार असून, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनाने सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख हभप विक्रमसिंह महाराज मोरे, हभप लक्ष्मण महाराज मोरे, हभप उमेश महाराज मोरे, अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे यांनी दिली.

या सोहळ्यासाठी प्रशासन, देवस्थान आणि स्थानिक ग््राामस्थांनी व्यापक तयारी केली असून, वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाणी, वैद्यकीय सेवा, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण देहू परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT