पुणे: विद्यार्थ्यांचे रास्त प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्याशी दहशतवाद्यांसारखे वर्तन केले जात असून, प्रशासन व सरकारकडून विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने वागवले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या दीप्ती चौधरी यांनी केला. पेपर फुटीची संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
दीप्ती चौधरी म्हणाल्या, विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांच्या शैक्षणिक अडचणी, परीक्षांसंबंधीचे मुद्दे आणि इतर मागण्या ऐकून घेऊन त्या सामंजस्याने सोडवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणि मागण्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांवर अन्यायाची परिसीमा झाली असून, त्यांना गुन्हेगारासारखी किंवा आतंकवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे. लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्या तरुणांवर होणारी ही कारवाई अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे ही वेळ आली असून, या परिस्थितीला विवेक भीमनवार जितके जबाबदार आहेत, तितकेच राज्याचे नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील जबाबदार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील अन्याय थांबवून मुख्यमंत्र्यांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.