Teacher Pudhari
पुणे

Daund Teacher Vacancy: दौंडच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा दुष्काळ; ९५ पदे रिक्त, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

उपशिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांची पदे रिक्त; अतिरिक्त भारामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणासमोर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

खोर: दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये तब्बल ९५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शासनाकडून 'गुढी पाडवा... पट वाढवा' या उपक्रमातून विद्यार्थी संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. दुसरीकडे मात्र त्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याचे पुढे आले आहे. यातून शिक्षण व्यवस्थेतील विसंगती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दौंड तालुक्यात एकूण ९५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामध्ये उपशिक्षकांची ४०, पदवीधर शिक्षकांची ३५ आणि मुख्याध्यापकांची २० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा थेट परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. अनेक शाळांमध्ये उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त वर्गांचा भार पडत आहे.

तर काही ठिकाणी एकाच शिक्षकाला अनेक वर्ग सांभाळण्याची वेळ येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित दर्जाचे शिक्षण देणे कठीण बनले आहे. तसेच, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, विविध उपक्रम आणि प्रशासकीय कामे यांच्यावरही परिणाम होत आहे. यामुळे ग्रामस्थांसह पालकांत नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, देऊळगावगाडा येथील ग्रामपंचायत सदस्य अक्षय बारवकर यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यांनी दौंड पंचायत समितीचे शिक्षण विभाग तसेच पुणे जिल्हा परिषद प्रशासनाकडे रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या शिक्षकांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षक असणे अत्यावश्यक आहे. आज ९५ पदे रिक्त असणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. शासनाने केवळ विद्यार्थीसंख्या वाढविण्याचे आवाहन न करता आवश्यक शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे.
अक्षय बारवकर, सदस्य, ग्रा. पं. देऊळगावगाडा.
दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील रिक्त शिक्षक पदे लवकरच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार पटसंख्या जास्त आणि कमी शिक्षक असलेल्या शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कमी पटसंख्या असलेल्या शाळांतून एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, तालुक्यातील रिक्त शिक्षक पदे नियमितपणे भरण्यात यावीत, यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
राहुल तांबे, गटशिक्षणाधिकारी, दौंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT