रामदास डोंबे
खोर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मात्र, आरक्षण सोडत अद्याप जाहीर न झाल्याने दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि दिग्गज नेते सर्वजणच ताटकळत आहेत.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीची घोषणा होणार असल्याची माहिती समोर येत असली, तरी या विलंबामुळे राजकीय सोंगट्यांची चाल अडखळली आहे. अनेक उमेदवारांनी प्रचारयंत्रणा सज्ज केली असली तरी आरक्षणाच्या फेरीने त्यांची संधी हुकण्याची भीती डोळ्यांसमोर उभी आहे. (Latest Pune News)
प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर दौंड तालुक्यातून तब्बल सात हरकती दाखल झाल्या होत्या. मात्र, प्रशासनाने एकही हरकत मान्य केली नाही. दौंड तालुक्यातील निवडणुका यंदा चुरशीच्या ठरणार, हे चित्र स्पष्ट झाले आहे. दिग्गज नेते तर आहेतच; मात्र तरुण आणि नव्या चेहर्यांचे देखील बळ यंदा ताकदीने पुढे आले आहे. सोडतीनंतर कोणाचे राजकीय स्वप्न साकार होणार आणि कोणाचे उमेदवारीचे गाडे अडणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, नितीन दोरगे आदी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रत्येक गट आपल्या पक्षाचा झेंडा दौंड तालुक्यात रोवण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुका फक्त स्थानिक नसून पुढील राजकीय समीकरणांचा पाया ठरणार आहेत.
आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय गणिते बदलणार, हे नक्की. कुणाच्या पदरी उमेदवारीची संधी येईल, तर कुणाच्या हातून उमेदवारी निसटणार, हे सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे. एकाच क्षणात आनंद, तर दुसर्याच क्षणात हताश, अशी स्थिती पाहायला मिळणार आहे. दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, आरक्षण सोडतीनंतर खरी धुरळ्याची लढाई पेटणार आहे. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तालुक्यातील राजकारणाला नवे वळण देणार, यात तिळमात्र शंका नाही.