

Violence against police
चाकण: पोलिस अंमलदाराच्या अंगावर सत्तूरने वार करणार्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. खराबवाडी (ता. खेड) गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळ ही घटना घडली.
दीपक अशोक जंगले (वय 19, रा. खराबवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. पोलिस अंमलदार शिवाजी वसंत मरकड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक जंगले याच्यावर यापूर्वी आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे. खराबवाडीमध्ये किरकोळ भांडणे झाली होती. त्यावेळी जंगले हातात सत्तूर घेऊन शिवीगाळ करत होता. स्थानिकांनी 112 वर कॉल करून या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिस अंमलदार शिवाजी मरकड हे सहकार्यांसह घटनास्थळी पोहचले. तेथे जंगले हातात सत्तूर घेऊन धमकावत होता. पोलिसांना पाहून त्याने मरकड यांना ‘जिवंत सोडत नाही,’ असे म्हणून जिवे मारण्याचे उद्देशाने सत्तूरने वार केला.
मरकड यांनी वार हुकवला. शिताफीने त्याला पकडले. जंगलेने त्यांच्याबरोबर झटापट सुरू केली. या वेळी जंगलेने मरकड यांच्या हातास चावा घेत दुखापत केली. अखेर जंगलेला पोलिसांनी अटक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.