Mining Pudhari
पुणे

Rahu Illegal Mining Forest Issue: राहू वनक्षेत्रात अवैध उत्खननाचा धुमाकूळ; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचा आरोप; वरिष्ठ चौकशीची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

राहू: दौंड तालुक्यातील राहू परिसरातील वनविकास महामंडळाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध उत्खनन आणि पर्यावरणाच्या लुटीप्रकरणी वनप्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारवाईचा देखावा उभा करताना मुख्य आरोपींना मात्र अभय दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

वनक्षेत्रातील अवैध उत्खनन आणि त्यामागील सूत्रधारांची माहिती प्रशासनाला असल्याची चर्चा आहे. मात्र, ठोस कारवाई करण्याऐवजी केवळ ‌‘अज्ञात‌’ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात वन विभागातील काही अधिकारी आणि उत्खनन माफियांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरील संरक्षणाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होणे शक्य नसल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

उत्खननामुळे जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत असून, डोंगरांचे सपाटीकरण, वृक्षतोड आणि जमिनीची धूप वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळीच कारवाई झाली नाही, तर भविष्यात नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढू शकतो, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.

वरिष्ठस्तरीय चौकशीची मागणी

राहू परिसरातील वनविकास महामंडळाच्या हद्दीत झालेल्या अनधिकृत माती उपशाप्रकरणी 28 एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तब्बल 10 दिवस उलटल्यानंतरही वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील ठोस कारवाई झालेली नसल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता संबंधित अधिकारी आणि मुख्य सूत्रधारांविरोधात कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT