उमेश कुलकर्णी
दौंड: पुणे रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन 9 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. तरी देखील या मार्गावर विद्युत लोकल सेवा सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. सन 2016 मध्ये मनमाड-दौंड तसेच पुणे-जम्मू तावी एक्स्प्रेसला विद्युत इंजिन लावून रेल्वेने ‘यश’ दाखवले; त्यानंतर पुणे-दौंड मार्गावरही काही एक्स्प्रेस गाड्यांना विद्युत इंजिन लावण्यात आले. परंतु प्रवाशांसाठी अत्यावश्यक असलेली विद्युत लोकल सेवा आजतागायत सुरूच झालेली नाही.
या विद्युत रेल्वेबाबत स्थानिक खासदार, आमदारांकडून सतत आश्वासने दिली गेली. प्रारंभी काही फलाटांची उंची अपुरी असल्याचे कारण पुढे करण्यात आले; त्यानंतर विविध ‘तांत्रिक अडथळे’ दाखवत काम वारंवार लांबणीवर टाकले गेले. निवडणुकीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या गाठीभेटी घेणारे नेते निवडणुका संपताच गायब होत असल्याने प्रवाशांमध्ये मोठी नाराजी आहे.
सकाळी 7.05 वाजता सुटणारी दौंड-पुणे शटल ही दौंड स्थानकावरच क्षमतेपलीकडे भरते. पाटस, कडेठाण, केडगाव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी व हडपसर येथून चढणाऱ्या प्रवाशांना पाय ठेवायलाही जागा नसते. या शटलला अतिरिक्त बोग्या जोडण्याची मागणी अनेकदा केल्यावरही रेल्वे प्रशासनाने दखल घेतलेली नाही. बारामती-पुणे सकाळची डेमू देखील बारामतीहूनच खचाखच भरलेली येते. त्यामुळे विद्यार्थी, दूध उत्पादक, तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
कोरोनानंतर बंद गाड्या सुरूच नाहीत
कोविड काळात बंद केलेल्या काही स्थानिक व पॅसेंजर गाड्या आजतागायत सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची पर्यायी वाहतूक अडचणीत येत असून, गर्दीत आणखी भर पडते. दरम्यान, याबाबत प्रवासी संघटनांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर प्रशासनाकडून कायद्याचा बडगा दाखवला जातो, गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे अनेक प्रवासी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. लोकल सेवा, अतिरिक्त बोग्या, बंद गाड्या पुन्हा सुरू करणे यासाठी प्रवाशांनी एकत्र येऊन जोरदार पद्धतीने मागणी करणे आवश्यक असल्याचे चित्र आता दिसत आहे.
प्रवाशांच्या प्रमुख मागण्या
दौंड-पुणे विद्युत लोकल तत्काळ सुरू करावी.
सकाळी 7.05 शटलला अतिरिक्त बोग्या जोडाव्यात.
बारामती-पुणे डेमूची क्षमता वाढवावी.
कोविड काळात बंद झालेल्या गाड्या तातडीने सुरू कराव्यात.
गर्दी व्यवस्थापनासाठी अधिक फेऱ्या व विशेष गाड्या चालवाव्यात.