Bio Energy Pudhari
पुणे

Daund Bio Energy Pollution: दौंड तालुक्यात बायो एनर्जी कारखान्याच्या प्रदूषणामुळे शेती उद्ध्वस्त; ग्रामस्थ संतप्त

मिरवडीतील जलस्रोत दूषित, उपाययोजना न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

राहू: मिरवडी (ता. दौंड) परिसरातील कुंजीर बायो एनर्जी कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे स्थानिक जलस्रोत मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहेत. या प्रदूषणामुळे शेतीचे आणि पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग््राामस्थांमध्ये तीव संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी युवा कार्यकर्ते नीलेश गवारे यांनी कंपनीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या बाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाला कारवाई करणे बाबत सूचना देण्यात आली असल्याची माहिती दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.

गेल्या काही काळापासून कुंजीर बायो एनर्जी प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी परिसरातील ओढे आणि भूगर्भातील पाणीसाठ्यात मिसळत असल्याचे समोर आले आहे. यामुळे विहिरींचे आणि कूपनलिकेचे पाणी दूषित झाले असून, त्याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. उभ्या पिकांना हे पाणी दिल्याने पिके जळून जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या गंभीर समस्येची दखल घेत मिरवडी ग््राामपंचायतीने अधिकृत ठराव मंजूर केला आहे. कंपनीने प्रदूषणावर तातडीने नियंत्रण मिळवावे आणि पर्यावरणाची हानी थांबवावी, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे. मात्र कंपनी प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याचे चित्र आहे.

स्थानिक ग््राामस्थांनी या प्रकरणी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि दौंड तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग््राामस्थांनी केला आहे. अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई का करत नाहीत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

जनआंदोलन छेडणार

कंपनीच्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. जलस्रोत खराब झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो. कंपनीने वेळीच उपाययोजना न केल्यास जनआंदोलन छेडले जाईल,असे नीलेश गवारे यांनी सांगितले.

याबाबत प्रदूषण नियंत्रण विभाग यांना कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
अरुण शेलार, तहसीलदार, दौंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT