

जावेद मुलाणी
इंदापूर: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, इंदापूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणासाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग््रेास विरुद्ध भाजप असा धुरळा या निवडणुकीत उडणार आहे.
निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग वाढली असून, पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. अनेकजण इच्छुक असल्याने पक्षश्रेष्ठीदेखील काही गटांचा अपवाद वगळता उमेदवारी जाहीर करण्यास दिरंगाई करत आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांनी सोशल मीडियावर आता माघार नाही, असा पवित्रा घेत वरिष्ठ नेत्यांवर दबाव आणण्याची खेळी खेळणे सुरू केले आहे. राष्ट्रवादी कॉंग््रेासविरुद्ध भाजप अशी थेट लढाई होत असली तरी राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेणार हे बघणे देखील गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे जिल्हा परिषदेत जास्तीचे सदस्य जावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. इंदापूर पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी जोरदार ताकद लावताना ते दिसत आहेत. सन 2009 पासून कृषिमंत्री भरणे हे इंदापूर पंचायत समितीवर आपली सत्ता आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असून, त्यांना पंचायत समितीने नेहमीच हुलकावणी दिली आहे. यंदा ते पंचायत समितीवर सत्ता आणण्यासाठी काय व्यूहरचना आखतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसऱ्या बाजूला भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी भाजपच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी करत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची फळी मजबूत केली आहे. त्यांना मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांच्या ताकदीसह इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीपासून स्थानिक कृष्णा भीमा विकास आघाडी करीत संधान साधले आहे. आता त्यांचा केवळ भाजपमध्ये औपचारिक प्रवेश बाकी असून, ते भाजपच्या बैठकांना उपस्थिती लावताना दिसून येत आहे. गारटकर यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा कितपत भाजपला होणार यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कोणाबरोबर जाणार याची साशंकता
राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविण्यात आली. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची पंचायत समितीवर कायम सत्ता राहिली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष वरिष्ठ पातळीवरून काय भूमिका घेणार हर्षवर्धन पाटील यांचा त्यावर काय निर्णय असेल, याबाबत अद्याप कोणतीही हालचाल दिसून येत नसली तरी तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते जोरदार बैठका घेत आपला कल जाणून घेण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे.
कृष्णा-भीमा विकास आघाडी कायम राहणार का?
इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या आणि तोंडावर राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पक्षाचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडलेले जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपाचे माजी आमदार यशवंत माने, प्रवीण माने यांच्यासह दोन्हीही शिवसेना, रासप, मनसे यांची एकत्रित मोट बांधत कृष्णा-भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपरिषदेची निवडणूक लढविण्यात आली. ही आघाडी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रित लढणार का, याबाबत त्यांच्या कोणत्याही बैठका होताना दिसत नसून सर्वजण कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी स्वतंत्ररीत्या घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे या आघाडीबाबत सध्यातरी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सन 2017 मधील पक्षीय बलाबल
मागील सन 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेत 7 गट आणि 14 गण होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग््रेास 4, काँग््रेास आय 3, पंचायत समितीतमध्ये काँग््रेास आय 8, राष्ट्रवादी काँग््रेास 6 असे पक्षीय बलाबल होते.
लोकसभा निवडणुकीपासून इंदापुरात कमळ चिन्ह बाजूला
लोकसभेच्या निवडणुकीतही महायुती विरुद्ध आघाडी असल्याने दोन्ही राष्ट्रवादी समोरासमोर लढल्या. यात घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना झाला. पुढे विधानसभेलाही कमळ चिन्हावर कुणी लढले नाही. नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्थानिक आघाडी झाल्याने कमळ चिन्ह घेता आले नाही. आता या निवडणुकीत जर स्थानिक आघाडी करत दुसरे चिन्ह घेतले तर कमळ चिन्ह कायम बाहेर राहत असल्याचे दिसणार आहे. एकीकडे दर निवडणुकीनंतर मोठे नेते भाजपमध्ये येताना दिसत असले तरी पक्षाचे चिन्ह मात्र कायम दूर राहत आहे. आताची तरी निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.