Milk Adulteration Pudhari
पुणे

Daund Milk Adulteration: दौंड तालुक्यात दूध भेसळीचा संशय; ग्राहकांना मिळतेय का खरंच शुद्ध दूध?

दूध संकलन केंद्रे आणि विक्रेत्यांची तपासणी करण्याची मागणी; गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये वाढली चिंता

पुढारी वृत्तसेवा

पांढरेवाडी: राज्यभरात तसेच पुणे जिल्ह्यात दूध भेसळीविरोधात कारवाया सुरू असताना दौंड तालुक्यातील ग्राहकांना खरोखरच शुद्ध दूध मिळतेय का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

दौंड तालुक्यातील कुसेगाव, पाटस, रोटी, वासुंदे, पडवी, माळवाडी, वरवंड, चौफुला, केडगाव, यवत आणि इतर ग्रामीण भागात दूध संकलन केंद्रे, डेअरी आणि खासगी दूध विक्रेत्यांमार्फत दररोज मोठ्या प्रमाणावर दूधपुरवठा केला जातो. अनेक ग्राहक नियमितपणे दूध खरेदी करतात. मात्र, दुधाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही अधिकृत माहिती सहज उपलब्ध होत नसल्याने ग्राहक संभ्रमात आहेत.

पुणे जिल्ह्यात दूध भेसळ प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, त्याचे धागेदोर थेट दौंड तालुक्यातील दूध संकलन केंद्रात पोहोचल्याने दौंड तालुक्यात दूध भेसळचे नवे रॅकेट समोर आले आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांनी दुधाच्या चवीत, घट्टपणात आणि गुणवत्तेत फरक जाणवत असल्याचे सांगितले.

मागील काही दिवसांपूर्वी कुरकुंभ, पाटसमध्ये पॅक बंद दुधात रबरासारखा पदार्थ आढळून आल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांनी दुधाची नियमित तपासणी आणि नमुना चाचण्यांची मागणी केली आहे. 'दूध शुद्ध आहे की नाही, याची खात्री ग्राहकांना मिळाली पाहिजे,' अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दूध भेसळीच्या घटनांबाबत राज्यभरात तसेच पुणे जिल्ह्यात सातत्याने कारवाया होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातील दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर आणि विक्रेत्यांचीही नियमित तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दूध हा केवळ अन्नपदार्थ नसून सार्वजनिक आरोग्याशी निगडित विषय आहे. त्यामुळे 'दौंड तालुक्यातील ग्राहकांना शुद्ध दूध मिळतेय का?' या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांनी व्यापक सर्वेक्षण आणि तपासणी मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT