अजय कांबळे
कुरकुंभ: दौंड तालुक्यातील मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. धोकादायक खड्डे, लांबलचक तडे व वर आलेल्या लोखंडी सळयांमुळे या मार्गावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अशा गंभीर प्रकाराकडे मात्र रस्ते विकास महामंडळ डोळेझाक करीत असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्ग कोट्यवधी खर्च करून तयार केला. सिमेंट काँक्रिटीकरणाच्या या रस्त्यावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. मात्र, येथील समस्यांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. कुरकुंभ हद्दीमध्ये नवरात्र उत्सवापूर्वी डागडुजी केली होती. तो रस्ता फक्त तीन दिवसांत उखडला. यातून महामार्गावर केल्या जाणाऱ्या कामाचा दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. महामार्ग तयार करण्याआधी जमिनीमध्ये मोठे खड्डे करून भुयारी, गटारी केल्या आहेत.
सोसायटी, इमारती व घरगुती वापरानंतरचे सांडपाणी गटारीमधून वाहते. नियोजनशून्य कारभारामुळे गटारी तुंबून घाण पाणी रस्त्यावरून वाहत असते. येथील एक अजब कारभार म्हणजे या रस्त्याच्या मधोमध गटारीचे चेंबर घेतले आहे. वाहनांमुळे चेंबरचे झाकणे वारंवार फुटतात. त्यालगतचा भाग खचला जातो. रस्त्याला जागोजागी लांबलचक तडे गेले आहेत. खड्डे व लोखंडी गजमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. फुटपाथ, पेव्हर ब्लॉक व कमी उंचीच्या दुभाजकाची दुरवस्था झालेली आहे.
ते रात्रीच्या सुमारास दिसून येत नाही. त्यामुळे अनेकदा वाहन दुभाजकावर चढून अपघात घडले आहेत. वाहनांच्या धडकांमुळे लोखंडी बॅरेकट्स तुटून, वाकून पडले आहे. पथदिव्यांचे खांब केव्हाही कोसळून चालू स्थितीत विद्युत वाहिन्या उघड्यावर असतात. फुटपाथलगत झाडे व कचरा वाढला आहे. अस्वच्छतेमुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. या सर्व प्रकारांमुळे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांमधून मागणी करीत आहे.
सिमेंटच्या रस्त्यावर मुरमाचा वापर
काँक्रिटीकरण रस्त्यावरील खड्डे मुरूम मातीचा टाकून बुजविण्याचा प्रताप केला गेला. डांबरीकरणाच्या माध्यमातून गतिरोधक बनविण्याचा जुगड केला होते. विशेषतः अशा नरकयातनेतून जाताना व येताना टोल सक्तीने वसुल केला जातो. परंतु सेवा देताना तिथे दुर्लक्ष केले जाते. टोल भरूनही खराब व असुरक्षितत रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
२० दिवसांपासून पथदिवे बंद
गेल्या वीस दिवसांपासून महामार्गालगतचे पथदिवे बंद आहेत. याकडे पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती विभाग दुर्लक्ष करीत आहे. दिवसा खड्ड्यांमुळे आणि रात्री अंधारामुळे वाहनचालकांना जीवाची बाजी लावावी लागते. याबाबत अधिकारी कोणत्याही प्रकारची दखल किंवा पाहणी करत नाहीत.