Dog Bite Death Pudhari
पुणे

Pune Rabies Dog Bite Death: पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने तरुणाचा रेबीजमुळे मृत्यू;दौंड तालुक्यात धक्कादायक घटना

लग्नाच्या तयारीवर दु:खाचा घाला; उपचार पद्धतीवरही प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

खोर: खामगाव (ता. दौंड) येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खामगाव नजिक गाडमोडी (गणेशनगर) येथील रहिवासी महेश राजेंद्र नागवडे (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे खामगाव परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी महेश नागवडे यांना राहत्या घरा नजीकच एका पिसाळलेल्या कुत्र्याने पाठीमागून पायावर चावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी तातडीने उपचार घेतले होते. सुरुवातीला प्रकृती स्थिर असल्याचे दिसत होते. मात्र अलीकडील काही दिवसांपूर्वी अचानक त्यांना त्रास जाणवू लागल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना रेबीज झाल्याचे स्पष्ट केले. उपचार सुरू असतानाच ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महेश यांची प्राणज्योत मालवली. महेश हे दहिटणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत अकाउंट विभागात कार्यरत होते.

महेश यांच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित भाऊ, एक विवाहित बहीण, चुलते असा मोठा परिवार आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका संघटक काळूराम नागवडे यांचे पुतणे होत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लग्नाच्या तयारीवर दु:खाचा घाला

महेश यांच्या लग्नाच्या हालचाली सुरू होत्या. नुकतेच एक स्थळ निश्चित होऊन दि. ८ फेब्रुवारी रोजी लग्नाची तारीख ठरविण्याचा कार्यक्रम होणार होता. मात्र त्याच्या आधीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने नागवडे कुटुंबीयांसह संपूर्ण खामगाव परिसर शोकमग्न झाला आहे.

उपचारांबाबत प्रश्नचिन्ह

कुत्रा चावल्यास सरकारी दवाखान्यात रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येते. महेश यांनी देखील सर्व आवश्यक उपचार पूर्ण केल्याची माहिती आहे. तरीही रेबीज झाल्याने मृत्यू झाल्यामुळे उपचार पद्धतीवर व वेळेवर परिणामकारक लस मिळाल्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आरोग्य यंत्रणेने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT