- पुणे ग्रामीण एलसीबीची मोठी कारवाई
- हुतात्मा चौक परिसरात सापळा रचून कारवाई
- ८० हजारांचे पिस्तुल जप्त, एक आरोपी अद्याप फरार
दौंड : दौंड शहरात बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतांवर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. हुतात्मा चौक रेल्वे ग्राउंड रोडवर गुरुवारी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ८० हजार रुपये किमतीच्या पिस्तुलसह दोन आरोपींना अटक केली आहे, तर त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २६ मार्च) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास काही तरुण विनापरवाना घातक शस्त्र घेऊन हुतात्मा चौक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने दौंड पोलिसांच्या मदतीने परिसरात सापळा रचला. संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांच्याकडे स्टीलची बॉडी असलेले मॅक्झिनसह पिस्तूल मिळून आले.
इरफान उर्फ शेरखान शब्बीर खान (वय २२, रा. कुंभार गल्ली, दौंड) आणि विशाल प्रकाश काटकर (वय ३०, रा. कुंभार गल्ली, दौंड) या दोघांना पोलिसांनी अटक केली, तर
सोनू उर्फ बिल्ला उर्फ पद्माकर शांताराम ताडे (रा. कुंभार गल्ली, दौंड) हा पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार आसिफ नबीलाल शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाचा किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार आसिफ शेख, सचिन घाडगे, पोलीस हवालदार योगेश नागरगोजे, अजित भुजबळ आणि दौंड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रुपेश कदम, किरण राऊत, सुभाष राऊत, अमीर शेख व अक्षय कुंभार यांच्या पथकाने केली आहे.