उमेश कुलकर्णी
दौंड: दौंड शहर आणि तालुक्यात बेकायदेशीर कट्टे बाळगणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली असून, खडकी परिसरातून एकाला देशी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसांसह रंगेहाथ अटक केली. याबाबत दै. ‘पुढारी’चे वृत्त खरे ठरले.
मिळालेल्या माहितीनुसार, खडकी (ता. दौंड) येथील शिवाजी महाराज चौक परिसरात वैभव संजय शिंदे हा तरुण संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती.
या माहितीच्या आधारे दौंड गुन्हे शोध पथकाने सापळा रचून वैभवला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 53 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी वैभव शिंदे याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग््राामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम, नितीन बोराडे, सुभाष राऊत, अमीर शेख, निखिल जाधव, किरण पांढरे, पवन माने, संजय कोठावळे आणि नितीन दोडमिसे यांच्या पथकाने केली. या घटनेचा तपास दौंड पोलिस करीत असून, या अवैध शस्त्रास्त्रांचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दै. ‘पुढारी’ने मांडलेली वस्तुस्थिती अधोरेखित
दौंड परिसरातील अवैध शस्त्रास्त्रांच्या वाढत्या धोक्याबाबत दै. ‘पुढारी’ने दोन दिवसांपूर्वीच सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. अनेक तरुणांच्या हाती ‘कट्टे’ पोहोचले असून, यामुळे शांतता भंग होऊ शकते, असा इशारा या वृत्तातून देण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे दै. ‘पुढारी’ने मांडलेली वस्तुस्थिती अधोरेखित झाली आहे.