यवत: दौंड तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर अनागोंदी पुन्हा एकदा समोर आली आहे. केडगाव परिसरातील बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरण ताजे असतानाच खामगाव येथे एका बोगस डॉक्टरला यवत पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना संबंधित व्यक्ती गेल्या दोन वर्षांपासून दवाखाना चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ओमप्रकाश बन्सिलाल स्वरांकर (वय 43, मूळ रा. भिलवाडा, राजस्थान. सध्या रा. वापी, गुजरात) असे ताब्यात घेतलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. खामगाव परिसरातील नागरिकांना कमी खर्चात आणि तत्काळ उपचार देण्याच्या नावाखाली स्वरांकर हा स्वतःला डॉक्टर म्हणून वावरत होता. परिसरातील गरीब व सर्वसामान्य नागरिक त्याच्यावर विश्वास ठेवून उपचार घेत होते. दररोज 200 हून अधिक रुग्णांची तपासणी करून इंजेक्शन, सलाईन तसेच विविध औषधोपचार केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
या उपचारांमुळे काही रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय व्यवसाय सुरू असतानाही आरोग्य विभाग, ग््राामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाला याची माहिती नव्हती का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. गेली दोन वर्षे हा प्रकार सुरू असताना संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
बुधवारी (दि. 27) दुपारच्या सुमारास वैद्यकीय क्षेत्रातील काही जागरूक व्यक्ती आणि ग््राामस्थांनी संशय व्यक्त करत स्वरांकरला यवत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पोलिसांकडून त्याच्याकडील कागदपत्रांची तपासणी सुरू असून, तो नेमक्या किती काळापासून हा व्यवसाय करत होता याचाही तपास सुरू आहे.
कठोर कारवाईची मागणी
दरम्यान, दौंड तालुक्यात गेल्या काही महिन्यांत बेकायदेशीर गर्भलिंगनिदान, अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय आणि आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेची अनेक प्रकरणे समोर आल्याने तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग््राामीण भागातील नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.