उमेश कुलकर्णी
दौंड: दौंड-पाटस रस्त्यावरील हॉटेल जगदंबा येथे गिरिम गावच्या हद्दीत झालेल्या भीषण गॅस सिलिंडर स्फोटात 10 जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी 6 जणांची प्रकृती अत्यवस्थ असून, ते 75 ते 80 टक्क्यांहून अधिक भाजलेले होते. या जखमींना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र, इतक्या गंभीर परिस्थितीतही ससून रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांकडून लेखी जबाबदारी घेऊन जखमींना त्यांच्या मूळ गावी हलवण्यास परवानगी दिली, ही बाब अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे.
याबाबत दौंड पोलिसांकडे चौकशी केली असता, नातेवाईकांनी “देखभाल करणारे कोणी नाही” असे कारण देत स्वतःहून जखमींना घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. परंतु एवढ्या गंभीर जखमी रुग्णांना नातेवाईकांच्या सांगण्यावरून सोडणे वैद्यकीय व कायदेशीरदृष्ट्या योग्य होते का? असा प्रश्न दौंड शहरात उपस्थित केला जात आहे. वास्तविक पाहता, यातील 4 ते 5 जण शेवटच्या घटका मोजत असल्याची चर्चा असूनही हॉटेल मालक व मॅनेजरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसेच या हॉटेलला घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीवरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
या प्रकरणामागे राजकीय हस्तक्षेप असल्याची जोरदार चर्चा दौंड शहरात सुरू आहे. दौंड शहर व तालुक्यात अनेक हॉटेल्स व ढाब्यांवर उघडपणे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असून, पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने हा गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ही घटना घडल्यानंतर काही ठिकाणी तात्पुरती कारवाई झाल्याचे दाखवले जात असले, तरी आजही अनेक मोठ्या हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर सुरू आहे. काही हॉटेलचालक केवळ बाहेर व्यावसायिक सिलिंडर ठेवून आतमध्ये घरगुती सिलिंडर वापरत असल्याचा देखावा करत आहेत.
एवढा मोठा स्फोट होऊनही 15 घरगुती सिलिंडर एकाच ठिकाणी कसे वापरण्यात आले? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. गॅस पुरवठादार शहरात मोकाट फिरत असून, त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, या दहा भाजलेल्या नागरिकांना न्याय मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत असून, या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, मोठ्या राजकीय दबावामुळे केवळ थातूरमातूर कारवाई करून दोषींना अभय दिले जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. राजकारण व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गोरगरिबांचा जीव जातो, याला जबाबदार कोण? हा प्रश्न दौंडकर नागरिकांना सतावत आहे.
स्फोटानंतर उपस्थित झालेले महत्त्वाचे प्रश्न
ससून रुग्णालयाने अत्यवस्थ रुग्णांना सोडण्याचा निर्णय कसा घेतला?
हॉटेल मालक, मॅनेजर व गॅस एजन्सीवर अद्याप गुन्हा का दाखल नाही?
15 घरगुती सिलिंडर वापरण्याची परवानगी कोणी दिली?
शहरात सुरू असलेल्या घरगुती गॅस गैरवापरावर कारवाई कधी होणार?
या प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार का?