Daund Rain Alert Bridge Closed Pudhari
पुणे

Daund Heavy Rain Alert: दौंडमध्ये पावसाचा जोर; भीमा नदीला पूर, पाच महत्त्वाचे पूल वाहतुकीसाठी बंद

राहू-पिंपळगावसह पाच पुलांवर पाणी; प्रशासनाचा खबरदारीचा निर्णय, नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

यवत: पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका दौंड तालुक्यालाही बसला आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीसह इतर नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून अनेक ठिकाणी पाणी पुलांवरून वाहू लागले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून दौंड तालुक्यातील पाच महत्त्वाचे पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

प्रशासनाकडून बंद करण्यात आलेल्या पुलांमध्ये राहू–पिंपळगाव पूल, देलवडी–वाळकी संगम पूल, वाळकी ते शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस मार्गावरील पूल तसेच दौंड व शिरूर तालुक्यांना जोडणारा नानगाव वडगाव रासाई पूल आणि कानगाव ते मांडवगण फराटे यांचा समावेश आहे. या पुलांवरून पाण्याचा वेग वाढल्याने आणि पाणी पुलाच्या पातळीपर्यंत आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

दौंड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, वरच्या धरण क्षेत्रातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि सततचा पाऊस यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पूल ओलांडणे धोकादायक ठरू शकते. कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

सोमवारी दुपारपासूनच या सर्व पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली असून संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुलांच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स उभारून नागरिकांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत बंद पुलांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या मार्गांवरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच मालवाहतूक करणारी वाहने प्रवास करीत असतात. त्यामुळे वाहतूक बंद झाल्याने अनेकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून काही ठिकाणी प्रवासासाठी अतिरिक्त अंतर कापावे लागत आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवास करण्याचे, आवश्यक असल्याशिवाय नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी काही ठिकाणीही खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीवर निर्बंध घालण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर आणि पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर संबंधित पुलांची पाहणी करूनच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT