Daund Railway Junction Pudhari
पुणे

Daund Crime Rise: दौंडमध्ये वाढती गुन्हेगारी; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

तडीपार प्रस्ताव रखडल्याची चर्चा; पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

उमेश कुलकर्णी

दौंड: दौंड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, पोलीस व राजकीय वर्गाकडून या गुन्हेगारांना मोठ्या प्रमाणात अभय मिळत आहे. दौंड शहरात मागील काही महिन्यांत अनेक मोठी भांडणे झाली, तसेच घरफोडी, महिलांची छेडछाड, अवैध धंदे, गांजा विक्री, खंडणी, हातभट्टीची दारू, पत्त्यांचे क्लब असे धंदे सुरू असून, अनेकदा नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. परंतु पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.

दौंड नगरपालिकेच्या निवडणूककाळात देखील आचारसंहिता चालू असतानासुद्धा मोर्चे काढण्यात आले. राजकीय नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली, जणू काही ज्या गुंडागर्दी करणाऱ्या लोकांनी कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेतली का? असा प्रश्न पडला होता, एवढे होऊन देखील सुस्त पडलेल्या पोलिसांनी मात्र कोणतीही कारवाई केली नाही. यामागे नक्की काय गोंधळ आहे हे पोलिसांनाच माहिती.

शहरात विविध गुन्हे घडत असतात. परंतु, पोलीस त्यांच्या सोयीप्रमाणे तक्रारी दाखल करून घेतात. एखादी अवघड तक्रार असेल तर त्याला टोलवाटोलवीची उत्तरे देतात व हेलपाटे मारून तक्रारदार वैतागला की पुन्हा पोलीस स्टेशनला जात नाही, असे चित्र पाहायला मिळते. सर्व ठिकाणच्या गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव पोलीस प्रशासनाने पाठवले होते. यामध्ये फक्त दौंडच वगळले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पोलिसांना विचारले, की आम्ही कारवाई करत आहोत असे सांगितले जाते. मग शहरातील जे गुन्हेगार आहेत, त्यांना तडीपार का करत नाहीत. कायदा सुव्यवस्था बिघडवतात त्यांचे काय मग दौंडमधील तडीपारांचे प्रस्ताव का रखडले याचे उत्तर पोलीस देतील का, असा प्रश्न पडत आहे.

गुन्हेगार इतके मुजोर झालेले आहेत की, हे कोणाला जुमानत नसल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी व्यावसायिकाला खंडणी मागितली होती तो आरोपी अद्यापही पोलिसांना सापडला नाही. परंतु तो आरोपी शहरातील अगदी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर एका ठिकाणी लपून बसलेला आहे. अनेकांचे व्हाट्‌‍सअप स्टेटस हा पाहत असतो, मग हा पोलिसांना का सापडत नाही. दौंडचे गुन्हे अन्वेषण शाखा करते काय, अनेक वर्षांपासून फरार असलेले आरोपी पोलीस का पकडत नाहीत, असा सवाल जनता करत आहे.

दौंड शहरातील गुन्हेगारी जर आटोक्यात आणली नाही तर भविष्यात शहरात मोठे गुन्हे घडू शकतात. दौंड हे रेल्वेने उत्तर भारत व दक्षिण भारतला जोडणारे महत्त्वाचे शहर आहे. मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचा वावर येथे होत असतो. परंतु, सुस्त पडलेल्या पोलिस प्रशासन आपल्या पोलिस स्टेशन हद्दीमध्ये परप्रांतीयांची नोंद तर घेतच नाहीत, तर एखादा गुन्हा घडला की पोलीस सांगतात, दुसरीकडे वर्ग करा किंवा बाहेर पाठवा असे प्रकार देखील काही महिन्यांपूर्वी दौंडमध्ये घडले आहेत.

पोलिस अधीक्षक मात्र दौंड शहराच्या बाबतीत गप्प का, असा सवाल आता जनता करू लागली आहे. आत्तापर्यंत पोलीस अधीक्षकांनी शहरातील नामचीन गुंडांवर तडीपारची कारवाई का केली नाही, त्यांच्यावर कोणता राजकीय दबाव आहे का? असा प्रश्न दौंडकर नागरिकांना पडत आहे. अनेकांवर अनेक गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर मात्र कारवाई नाही, हे कसे काय? त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गृह खात्याने दौंड शहराचे सर्व रेकॉर्ड मागवून तपासणी गरजेचे आहे, नाही तर एखादी मोठी घटना घडल्यानंतर पश्चाताप करून काही उपयोग होणार नाही. हे मात्र तितकेच सत्य होय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT