उमेश कुलकर्णी
दौंड: दिवसेंदिवस दौंड शहर अधोगतीकडे चालले असून, राजकीय नेत्यांच्या आपापसांतील कुरघोड्यांमुळे शहर बकाल झाले आहे. एकेकाळी गजबजलेली दौंडची बाजारपेठ आज ओस पडली असून, अनेक मोठे व्यापारी पुण्यात स्थायिक झाले आहेत. याला कारणीभूत ठरत आहे दौंड शहराकडे झालेले राजकीय दुर्लक्ष.
शहरात विकास झाल्याच्या कितीही गमजा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात दौंड शहराची अवस्था मात्र ’जैसे थे’ आहे. पूर्वी बाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी दौंडमध्ये येत असत; मात्र सततची भांडणे, दौंड बंद, बाहेरील नागरिकांना मारहाण होण्याच्या घटना आणि असुरक्षित वातावरणामुळे व्यापारपेठेला उतरती कळा लागली आहे.
रिक्षाभाड्यांचा मनमानी कारभार
कॉर्ड लाइन स्टेशनवरून दौंड शहर किंवा बारामतीकडे जाण्यासाठी रिक्षाचालक अवाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. गरीब, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर पायपीट करावी लागत असून, मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नेते झालेत गायब?
इतर वेळी रेल्वे प्रश्नावर सतत श्रेय घेणारे नेते सध्या कोणत्या बिळात लपले आहेत? असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. शहरातील जुना मालधक्का बंद अवस्थेत असून, ही जागा काही लोकांच्या घशात जाण्याची शक्यता असल्याची चर्चा दौंडकरांमध्ये सुरू आहे.
खा. सुप्रिया सुळे काय करणार?
दौंड रेल्वे प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे पूर्वी आग््राही भूमिका घेत असत; मात्र गेल्या एक वर्षापासून त्यांनी या प्रश्नावर एकदाही ठोस भूमिका मांडलेली नाही. यामुळे रेल्वे प्रशासनातील मुजोर अधिकारी व स्थानिक ठेकेदारांचे फावले आहे. दौंडमधील रेल्वे ठेकेदार स्थानिक असल्याने जणू काही रेल्वेच खरेदी केली आहे, अशा पद्धतीने वागत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. रेल्वे अधिकारी यावर लगाम का घालत नाहीत? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
संशयास्पद बाबींची चौकशी गरजेची
रेल्वेचे काही अधिकारी व ठेकेदार यांच्यात आर्थिक संगनमत असल्याचे आरोप असून, काही वर्षांपूर्वी येथून बदली झालेले अधिकारी पुन्हा दौंड रेल्वेसेवेत कसे आले, याची चौकशी होणे आवश्यक आहे. जुने इलेक्ट्रिक शेड बांधून तयार असतानाही विविध कारणे देत ते सुरू करण्यात चालढकल केली जात आहे.
एकत्र येण्याची गरज
रेल्वेचे श्रेय घेणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांनी आतातरी राजकीय मतभेद बाजूला ठेवून दौंड शहराच्या विकासासाठी एकत्र येणे आवश्यक आहे; अन्यथा जनता एक ना एक दिवस नेत्यांना धडा शिकवेल, यात शंका नाही. तोपर्यंत मात्र दौंड शहर पूर्णपणे उजाड व बकाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचा उद्रेक होऊन ‘रेल रोको’ची शक्यता
याबाबत दै. ‘पुढारी’ने सडेतोड लिखाण केल्यानंतर शहरातील काही ज्येष्ठ नेते व नागरिक एकत्र येऊन ‘रेल रोको’सारखा तीव आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या मुजोर भूमिकेला चांगलाच दणका देण्याची तयारी असून, एका मोठ्या राजकीय नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.