

भवानीनगर: यावर्षीच्या गाळप हंगामामध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने माळेगाव सहकारी साखर कारखान्याला साखर उताऱ्यात मागे टाकून आघाडी घेतली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्यापेक्षा 0.16 टक्के जास्त साखर उतारा श्री छत्रपती कारखान्याने मिळवला आहे.
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला की जिल्ह्यातील सोमेश्वर, माळेगाव व श्री छत्रपती या साखर कारखान्यांच्या गाळपाकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागते. जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांमध्ये सोमेश्वर, माळेगाव आणि श्री छत्रपती कारखाना हे तीन साखर कारखाने उसाचे गाळप, साखर उत्पादन व साखर उतारा मिळवणे यामध्ये आघाडीवर असतात. त्यामुळे या साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागलेले असते. साखर उताऱ्यामध्ये मागील अनेक वर्षापासून नेहमीच पिछाडीवर असणाऱ्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने यावर्षी माळेगाव साखर कारखान्यापेक्षा जास्त साखर उतारा मिळवून जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांक मिळावला आहे. साखर उताऱ्याच्या बाबतीत सोमेश्वर कारखाना जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर असून या कारखान्याने सरासरी 11.10 टक्के साखर उतारा मिळवलेला आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आघाडी मिळवत 10.85 टक्के सरासरी साखर उतारा मिळवला आहे.
गाळप हंगामाच्या सुरुवातीला माळेगाव सहकारी साखर कारखाना साखर उताऱ्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता, परंतु डिसेंबर महिन्यामध्ये श्री छत्रपती कारखान्याने साखर उताऱ्यामध्ये आघाडी घेत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात माळेगाव कारखान्यापेक्षा 0.16 टक्क्याने साखर उतारा जास्त मिळवला आहे. माळेगाव कारखान्याने 10.69 टक्के सरासरी साखर उतारा मिळवला आहे. जास्तीत-जास्त साखर उतारा मिळवण्यासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे.
श्री छत्रपती कारखान्यापेक्षा सोमेश्वर कारखान्याचा साखर उतारा 0.25 टक्क्याने जास्त आहे. श्री छत्रपती कारखान्याची जास्तीत-जास्त साखर उतारा मिळवण्याची घोडदौड जोरात सुरू असून, आता लवकरच श्री छत्रपती कारखाना सोमेश्वर कारखान्याच्या साखर उताऱ्याच्या जवळ येणार आहे. 28 डिसेंबरला सोमेश्वर कारखान्याला दैनंदिन साखर उतारा 11.98, माळेगाव कारखान्याला दैनंदिन साखर उतारा 11.85 व श्री छत्रपती कारखान्याला दैनंदिन साखर उतारा 11.59 मिळाला आहे.
साखर उत्पादन ‘सोमेश्वर’ची बाजी
सोमेश्वर कारखान्याने आतापर्यंत 5 लाख 25 हजार 803 टन उसाचे गाळप करून 5 लाख 81 हजार 100 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. माळेगाव कारखान्याने 5 लाख 6 हजार 954 टन उसाचे गाळप करून 5 लाख 32 हजार 200 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. श्री छत्रपती कारखान्याने 4 लाख 33 हजार 295 टन उसाचे गाळप करून 4 लाख 61 हजार 200 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या साखर कारखान्यांनी गाळप हंगामाचे 56 दिवस पूर्ण केले आहे.
श्री छत्रपतीचे 12 लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट्य
श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यांमध्ये गाळप हंगामाचे योग्य नियोजन झाल्यामुळेच कारखान्याला जास्तीत-जास्त साखर उतारा मिळत आहे. संचालक मंडळांने 12 लाख टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे यांच्यासह संचालक मंडळ कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप आपल्याच कारखान्यात करावे, असे आवाहन सभासदांना वेळोवेळी करीत आहेत.