पुणे: ‘माझं त्या दिवशीचे संपूर्ण भाषण ऐका, मी जे वाकडं काम सरळबाबत म्हटलं आहे, त्यात माझं असे म्हणणं होत की, अधिकारी आणि शेतकर्यांचं नातं असे असलं पाहिजे की समोरचा माझ्या घरचा माणूस आहे. अधिकार्यांनी लोकांची अडवणूक करू नये, यासाठी मी ते वक्तव्य बोलीभाषेत बोललो होतो.’ विनाकारण माझ्या त्या बोली भाषेचा विपर्यास केला गेला असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे नवनिर्वाचित कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
राज्याचे कृषिमंत्री भरणे हे सोमवारी (दि.2) पुणे दौर्यावर होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. भरणे म्हणाले की मला कृषिमंत्री पद दिल्याबाबत मी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो.
कर्जमाफीबाबत विचारले असता ते म्हणाले, उद्या मी पदभार स्वीकारल्यानंतर या संदर्भातला आढावा घेईल. कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. माहिती घेतल्याशिवाय मी काही बोलणार नाही. मी माहिती घेऊन आपल्याशी बोलेल.
हनुमंत कोकाटे यांच्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्या पोस्टबाबत विचारले असता ते म्हणाले की, या बाबतीत मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही. अशी दमबाजी करणे हे योग्य नाही. त्याचा वेगळा अर्थ निघाला असावा. हनुमंत कोकाटे असे करणार नाहीत. मी त्यांना जवळून ओळखतो.
माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सातपुडा बंगला अजूनही सोडलेला नाही. त्यावर ते म्हणाले की मला शासनाने सिद्धगड बंगला दिलेला आहे. मला दिलेला बंगला हा माझ्यासाठी चांगला आहे. मी त्यातच राहणार आहे. माझा बंगला मी कायम ठेवणार आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत भरणे यांना विचारलं असता ते म्हणाले, मी जे भाषण केलं त्या भाषणाचा पूर्ण सारांश तुम्ही ऐका. त्यात मी चुकीचं बोललेलो नाही. माझ्या बोलीभाषेचा विपर्यास केला गेला.
अधिकार्यांनी लोकांची अडवणूक करू नये, यासाठी मी ते वक्तव्य बोलीभाषेत बोललो होतो. माझ्या बोलीभाषेचा विपर्यास केला गेला. संजय राऊत मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. मी शेतकर्याचा मुलगा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी या वेळी केला. तसेच ते पुढे म्हणाले की मी चुकणारा माणूस नाही, मी खूप समंजस माणूस आहे. मी असं वक्तव्य करणार नाही, असे या वेळी भरणे म्हणाले.