बारामती : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू झाला. आता गळीत हंगाम वेग घेत असताना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेबाबत कोणतेही शिस्तबद्ध नियोजन दिसत नाही. रस्त्यावर रिफ्लेक्टरविना, अतिरिक्त भारासह आणि नियमबाह्य पद्धतीने प्रवास करणारी वाहने धोकादायक ठरत आहेत. गत आठवड्यातच बारामतीत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी यासंबंधी कारखानदारांची बैठक घेतली होती. परंतु, त्यानंतरही कारखाने याबाबत अजून उदासीन असल्याचे दिसून येत आहे. मोठी दुर्घटना घडल्यावरच जाग येणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गाळप हंगाम सुरू होताच सुरक्षित वाहतूक अभियान हाती घेणे आवश्यक असते. त्यानुसार गत आठवड्यात बारामतीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी तीन तालुक्यातील सहकारी, खासगी कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. परंतु तरीही कारखाने-वाहतूकदार यांच्याशी समन्वय याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामीण भागात वाहतुकीबाबत बेफिकिरी वाढली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांसाठी केवळ ऊस वाहतूकदार जबाबदार नाहीत; पण नियमांचे पालन न झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्घटनांना जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या बारामती तालुक्यात माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती हे सहकारी तसेच शरयू ॲग्रो, बारामती अग्रो, दत्त इंडिया या खासगी साखर कारखान्यांची ऊस वाहतूक जोरात सुरू आहे. अशा धोकादायक वाहनांवर वेळीच कारवाई न झाल्यास गंभीर अपघातांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असून, विशेषतः रात्री व पहाटेच्या वेळी प्रवास करताना अधिक सतर्कता आवश्यक असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
यापूर्वी अनेकांना कायमचे अपंगत्व
रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उसाचे ट्रॅक्टर-ट्रॉली उभी करणे, मागील बाजूस रिफ्लेक्टर नसणे, एका ट्रॅक्टरला दोनड्ढतीन ट्रॉली जोडणे, कर्णकर्कश साउंड सिस्टिम, विनापरवाना व विनाकागदपत्रे वाहने, तसेच अल्पवयीन चालकांची वाढ यामुळे फलटण, निरा, मोरगाव, भिगवण, इंदापूर आदी मार्गांवर गंभीर अपघात यापूर्वी घडले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व तर काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
दोन ट्रॉली जोडत धोकादायक पद्धतीने होणारी ऊस वाहतूक.
उसाची धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू आहे. साखर कारखाना, शेतकी विभाग, ऊसतोड मुकादम व वाहनचालक यांच्यासाठी कार्यशाळा घेतली आहे. वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात वाहनांना रिप्लेक्टर बसविण्याबाबत शिबिरे घेत आहोत.सुरेंद्र निकम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती