संरक्षक भिंतीचे काम झाले, कठडे कधी बसविणार? आंबेगाव बुद्रुक परिसरातील नागरिकांचा सवाल Pudhari
पुणे

संरक्षक भिंतीचे काम झाले, कठडे कधी बसविणार? आंबेगाव बुद्रुक परिसरातील नागरिकांचा सवाल

कात्रज बाह्यवळण मार्गावर अपघाताचा धोका

पुढारी वृत्तसेवा

धनकवडी: कात्रज बाह्यवळण मार्गावरील आंबेगाव बुद्रुक परिसरातील शिवसृष्टीजवळ कात्रजकडे जाणार्‍या सेवा रस्त्यावरील संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले. मात्र, साइड पट्ट्यांसह संरक्षक कठडे बसविण्याचे काम अद्यापही अर्धवट आहे. यामुळे अपघाताचा धोका असल्याने हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

आंबेगाव बुद्रुक परिसरात बाह्यवळण मार्गावर कात्रजकडे जाणार्‍या सेवा रस्त्यावरील धोकादायक टेकडीला लोखंडी जाळीच्या साहाय्याने आच्छादित करून संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सेवा रस्त्यालगतची दरड कोसळण्याची शक्यता राहिली नाही. (Latest Pune News)

सेवा रस्त्याचे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले कामही झाले आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्ता अधिक सुरक्षित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिक उपाययोजना करण्याची गरज आहे.

संरक्षक भिंतीचे काम झाले असले, तरी शिवसृष्टीजवळ भिंताडे नगरकडे जाणार्‍या रस्त्यावर संरक्षक कठडे बसविण्याची गरज आहे. सरंक्षक कठड्यांअभावी या रस्त्यावर अपघाताचा धोका नाकारता येत नाही. यामुळे या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कठडे कधी बसविणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

भिंताडे नगरकडे जाणार्‍या रस्त्यावर अनेक सोसायटी आणि मंगल कार्यालयासह मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. सायंकाळी दररोज तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक शिवसृष्टीच्या बाजूला विरंगुळ्यासाठी बसतात. मात्र, संरक्षक भिंत नसल्याने अपघाताचा धोका नाकारता येत नाही.

तसेच या रस्त्याच्या बाजूला खडीचे ढीग, राडारोडा, तसेच महावितरण कंपनीच्या केबल आहेत. हा अडथळा काढल्यास रस्ताही रुंद होऊन वाहतुकीस अडथळा होणार नाही, असे सागर पाटील आणि आदर्श एलोरे यांनी सांगितले. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

शिवसृष्टीच्या बाजूने भिंताडेनगरकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडे नसल्याने अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी लवकरात लवकर संरक्षक कठडे उभारणे गरजेचे आहे. - सुनील पवार,
रहिवासी, आंबेगाव बुद्रुक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT