पुणे

Dandiya-Garba Event : दांडिया-गरबाच्या पुण्यात कार्यक्रमांची धूम!

अमृता चौगुले

पुणे : नवरात्रोत्सव जवळ आलाय… तर दांडिया-गरबाच्या कार्यक्रमांची रेलचेल असणारच… या कार्यक्रमांसाठी जसे कलाकार-नृत्य दिग्दर्शक सज्ज आहेत, त्याचप्रमाणे पुण्यातील इव्हेंट कंपन्यांकडूनही कार्यक्रमांचे जोमाने नियोजन सुरू आहे. नवरात्रोत्सवात यंदा दांडिया-गरबाच्या कार्यक्रमांची धूम पाहायला मिळणार असून, नऊही दिवस ठिकठिकाणी अंदाजे दोन हजारांहून अधिक दांडिया-गरबाचे कार्यक्रम रंगणार आहेत. त्यासाठी इव्हेंट कंपन्यांची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. सजावटीपासून ते सेलिबि—टी गेस्टसाठीचे जोरदार नियोजन इव्हेंट कंपन्यांकडून करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरल्याने उत्सवाची तयारी सगळीकडे सुरू आहे. पण, उत्सवातील रंगतदार दांडिया-गरबाच्या कार्यक्रमांची धूमही शहर आणि उपनगरांत अनुभवायला मिळेल. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच दांडिया-गरबाचे कार्यक्रम रंगणार असून, त्यात सेलिब्रिटी गेस्ट, डीजे, ऑर्केस्ट्रा समूह, नृत्यदिग्दर्शक आणि सह नृत्य कलाकार आदी सहभागी होणार आहेत.

दांडिया-गरबासाठी खास ऑर्केस्ट्रा विविध गाण्यांवर कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून, कोथरूड, डेक्कन, वाघोली, एरंडवणे, कोरेगाव पार्क, कॅम्प, विमाननगर, खराडी, हिंजवडी अशा विविध ठिकाणी दांडिया-गरबाच्या बहारदार कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. असे कार्यक्रम आयोजित करणार्‍या इव्हेंट कंपन्यांचे काम नवरात्रोत्सवाच्या तीन महिने आधीच सुरू झाले होते आणि आता ते अंतिम टप्प्यात आले आहे. इव्हेंट कंपन्यांच्या टीमने वेगवेगळी लॉन्स, मैदान आणि सभागृहांमध्ये हे कार्यक्रम आयोजित केले आहेत. प्रत्येक कार्यक्रमाला प्रायोजक मिळाले असून, सेलिब्रिटींच्या उपस्थितीपर्यंतचे नियोजन इव्हेंट कंपन्यांनी केले आहे. दहाही दिवसांत सुमारे 30 ते 35 कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

इव्हेंट अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट असोसिएशनचे (इमा) सदस्य निखिल कटारिया म्हणाले, की इव्हेंट कंपन्यांसह लाईटमन ते नृत्य कलाकारापर्यंत सर्वांना काम मिळाले आहे. मीसुद्धा दांडिया-गरबाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पोलिस परवानगी ते तिकीट विक्रीपर्यंत…ऑर्केस्ट्राच्या ग्रुपपासून ते लायटिंगपर्यंतचे काम टप्प्याटप्प्याने करावे लागते.

इव्हेंट कंपन्यांचे काहींचे 5 कार्यक्रम, तर काहींचे 9 कार्यक्रम आहेत. कलाकारांपासून ते इव्हेंट कंपनीच्या संचालकांपर्यंत एक साखळी आहे. प्रत्येक जण मिळून काम करीत आहे. एका इव्हेंट कंपनीचे अर्पण कासार म्हणाले, की आम्हीही नवरात्रोत्सवात कार्यक्रम आयोजित केला आहे. दर वर्षी तीन महिन्यांपूर्वी आम्ही नियोजनाला सुरुवात करतो. सध्या तिकीट विक्रीचे काम सुरू असून, पाच हजार लोकांच्या येण्याची शक्यता आहे, त्यानुसार नियोजन केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT