पुणे

कृष्णा खोर्‍यातील धरणे सुरक्षित; ‘जलसंपदा’कडून तपासणी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पावसाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने कृष्णा खोर्‍यातील सर्व प्रकारच्या छोट्या-मोठ्या अशा एकूण नऊशे धरणांची सुरक्षितता तपासली आहे. त्यानुसार धरणांची स्थिती मजबूत आहे. किरकोळ दुरुस्तीसह विविध उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. जलसंपदा विभागाकडून दरवर्षी कृष्णा खोर्‍यातील धरणांच्या सुरक्षिततेबाबत तपासणी केली जाते. छोटे-मोठे अशी एकूण नऊशे धरणे आहेत. खात्यातील अधिकारी, तांत्रिक कर्मचार्‍यांकडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये धरणाचे गेट उघडतात का? ग्रिसिंग, ऑइलिंग करण्याची गरज आहे का? दरवाजे व्यवस्थित आहेत का? याची तपासणी झाली.

पावसाचा अंदाज पाहून धरणसाठ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जलसंपदा विभागाने धरणसाठ्यावर लक्ष ठेवण्याचे नियोजन केले आहे. पावसाचा अंदाज बांधून नदीला पूर येऊ शकतो का? तसे असेल तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देणे, पूरस्थितीचा फटका बसणार्‍या नागरिकांचे स्थलांतर करणे त्यासाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधणे यासारख्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी जलसंपदा विभाग सज्ज झाला आहे, असे विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

जलसपंदा विभागाने अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता तसेच सचिव पातळीवर अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असून, पावसाच्या पाण्याने धरणे पूर्ण भरली पाहिजे. त्यासाठी किती आणि कशा प्रमाणात पाणी सोडावे याचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच पूरस्थितीत कमीत कमी जीवित आणि वित्तहानी व्हावी यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्नशील आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT