जेवणाचे ताट ओलांडून गेले ते परतलेच नाहीत!

जेवणाचे ताट ओलांडून गेले ते परतलेच नाहीत!
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हर्षद व त्याचा भाऊ प्रथमेश यांनी सोमवारी दुपारी राजाराम तलावात पोहायला जाण्याचा हट्ट धरला. आईने जेवून जावा, असा आग्रह केला; परंतु त्यांनी ऐकले नाही. जेवणाचे ताट ओलांडून ते पोहण्यासाठी घराबाहेर पडले आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला. आईचे ऐकले असते व ते जेवायला बसले असते आणि वाईट वेळ टळली असती. या अपघातात दोघा पोटच्या गोळ्यांचा मृत्यू झाल्याने दौलतनगरातील पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सचिन पाटील हे दौलतनगर येथे पत्नी गीता आणि दोन मुले असे हे कुटुंब गुण्यागोविंदाने राहतात. हर्षद दहावीच्या परीक्षेत 66 टक्के गुण मिळवून पास झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. सोमवारचा दिवस मात्र या कुटुंबासाठी अक्षरशः काळ बनून आला. वेळ दुपारी दोनची. हर्षद आणि प्रथमेश यांची पोहायला जायची गडबड सुरू झाली. तशी तयारी त्यांनी केली. सोबत कपडे घेतले. स्वतःकडे कुठले वाहन नसल्याने चुलत्याची दुचाकी मिळवली. सोबत मूळचा असळज (ता. गगनबावडा ) येथील जयराज संतोष पाटील ( वय 19 ) या आत्याच्या मुलाला घेतले. मुलांची ही गडबड पाहून आईने त्यांना जेवून जाण्याचा आग्रह केला; पण त्यांनी ऐकले नाही. चुलत्यांनी दुचाकी नेण्यास विरोध केला, तरीदेखील मुलांनी ऐकले नाही.

पाटील दाम्पत्याच्या स्वप्नांचा चुराडा

घरची परिस्थिती बेताची असलेल्या पाटील कुटुंबीयांचे प्रमुख सचिन पाटील यांनी अत्यंत काबाडकष्टातून आणि गरिबीला तोंड देत दोन मुलांना मोठे केले. शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्यात उमेद निर्माण केली. प्रथमेश नाईट कॉलेजमध्ये बी. कॉम. भाग 1 मध्ये शिक्षण घेत होता, तर लहानगा हर्षद नुकताच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. ही तरणीबांड पोरं पाटील कुटुंबीयांची संपत्ती होती. आणखी चार ते पाच वर्षांनी ही पोरं कुटुंबाचा आधारवड बनणार होती. त्यामुळे या दोघांकडून आई-वडिलांना मोठ्या अपेक्षा होत्या. आज ना उद्या कुटुंबाला चांगले दिवस येतील, अशी आशा आई-वडिलांनी बाळगली होती; मात्र एका क्षणात या स्वप्नांचा चुराडा झाला. दोन्ही मुलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच पाटील दाम्पत्याला जबर धक्का बसला. काही क्षण त्यांना बोलणेही अशक्य झाले.

दौलतगरसह शहरावर शोककळा

त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना प्रथमेशचा रात्री आठ वाजता मृत्यू झाला. ऐन उमेदीत आलेल्या दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूने दौलतनगरसह शहरावर शोककळा पसरली आहे. या घटनेने दौलतनगर परिसर सुन्न झाला आहे.

तिघे हवेत फेकले गेले

तिघे राजाराम तलावाच्या दिशेने जात होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठशेजारच्या आप्पासाहेब पवार चौकात कडक पोलिस बंदोबस्त होता. बंदोबस्त पाहून मुले घाबरली आणि राजाराम तलावाकडे पोहायला न जाता पुन्हा घराच्या दिशेने परतत होती. सायबर चौकात आले असता त्यांना कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, हर्षद, प्रथमेश आणि जयराज हवेत फेकले गेले. यात हर्षदचा जागीच मृत्यू झाला, तर प्रथमेश व जयराज गंभीर जखमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news