Dagdusheth Ganpati Temple Expansion: पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्ताराचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मंदिराचा विस्तार करण्यासाठी मंदिरालगत असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याची जागा देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रस्तावाला तत्त्वतः सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे. मात्र, या निर्णयाला काही संघटना आणि काँग्रेसने विरोध केला आहे.
दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना पोलीस ठाणे दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, पोलीस ठाण्याचे स्थलांतर लगेच होणार नाही.
बुधवार पेठ परिसरात नवीन आणि आधुनिक पोलीस संकुल उभारल्यानंतर फरासखाना पोलीस ठाणे आणि त्याच्याशी संबंधित कार्यालये त्या ठिकाणी हलवली जाणार आहेत. त्यानंतर सध्याची जागा मंदिराच्या विस्तारासाठी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल.
या जागेवर मंदिराचा विस्तार झाल्यास भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था, गर्दीचे नियोजन आणि इतर सुविधांमध्ये वाढ करता येईल, असा दावा केला जात आहे.
या प्रस्तावामागे आमदार हेमंत रासने यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मते, फरासखाना पोलीस ठाणे नवीन ठिकाणी हलवून सध्याची जागा दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारासाठी वापरता येईल.
या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्र्यांकडून संबंधित विभागाकडून अहवाल मागवण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक अहवाल शासनाकडे पाठवला असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अंतिम निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे.
मंदिराच्या विस्तारासाठी पोलीस ठाण्याची जागा देण्याला हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनी विरोध केला आहे. मंदिराचा विस्तार करताना केवळ सध्याच्या गरजा न पाहता पुढील अनेक वर्षांचा विचार करायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. दगडूशेठ गणपती मंदिरासाठी दुसऱ्या जागेचा पर्यायही विचारात घ्यावा, असे त्यांनी सुचवले.
लाल महाल आणि शनिवारवाडा परिसराचा पर्यायही त्यांनी मांडला. या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि नागरिक येत असल्याने तेथे मंदिरासाठी जागा उपलब्ध केल्यास गर्दी आणि वाहतुकीचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.
फरासखाना पोलीस ठाणे हलवण्याची गरज काय, असा सवाल करत दवे यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रस्तावावर काँग्रेसनेही प्रश्न उपस्थित केले आहेत. फरासखाना परिसरात केवळ एक पोलीस ठाणे नसून पोलिसांशी संबंधित अनेक कार्यालये आणि युनिट्स आहेत.
पोलीस ठाणे आणि इतर कार्यालये दुसऱ्या ठिकाणी हलवल्यानंतर त्यांची व्यवस्था कुठे केली जाणार, याबाबत सरकारने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
या परिसरातील रस्ते अरुंद असून आधीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे पोलीस यंत्रणा हलवल्याने भविष्यात नागरिकांना अडचणी निर्माण होऊ शकतात, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे.
एकीकडे दगडूशेठ गणपती मंदिराचा विस्तार करून भाविकांना अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे फरासखाना पोलीस ठाण्याची जागा मंदिरासाठी देण्याच्या प्रस्तावामुळे विरोध वाढत आहे.
मंदिराचा विस्तार, भाविकांची सोय, पोलीस यंत्रणेची गरज, वाहतूक व्यवस्था आणि पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण या सर्व गोष्टींचा समतोल साधण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे. या प्रस्तावावर सरकार अंतिम निर्णय काय घेते आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या स्थलांतराबाबत पुढे काय होते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.