Scam Pudhari
पुणे

D Y Patil B School Financial Fraud Case: डी. वाय. पाटील बी-स्कूलमध्ये ५ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार? माजी संचालकावर गुन्हा दाखल

प्रवेश प्रक्रिया, वेतन आणि सहलींच्या खर्चात अनियमिततेचा आरोप; फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आर्थिक गैरव्यवहार उघड

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शाळेतील प्रवेश प्रक्रिया, शिक्षकांचे वेतन, शैक्षणिक सहलींचा खर्च अशा प्रकरणांत आर्थिक गैरव्यवहार करून शैक्षणिक संस्थेची ४ कोटी ९८ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १ ऑक्टोबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल येथे घडला. याप्रकरणी शाळेच्या माजी संचालकाविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल आनंदराव गावंडे (५०, रा. बिल्डिंग एफ-५, फ्लॅट क्र. १८, कॅम्प गार्डन, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माजी संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या खजिनदार असलेल्या महिला पदाधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल गावंडे हा संस्थेचे संचालक तसेच डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठाचा प्र-कुलगुरू म्हणून कार्यरत होता. संस्थेचा दैनंदिन कारभार, आर्थिक व्यवहार, प्रवेश प्रक्रिया, कर्मचारी वेतन, प्रवेश सल्लागारांची बिले तसेच विविध खर्चांना मंजुरी देण्याचे काम आरोपीच्या नियंत्रणाखाली होते. दरम्यान, ऑगस्ट २०२५ मध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमिततेचा संशय आल्याने संस्थेने ए. झेड. बी. अँड पार्टनर्स या संस्थेमार्फत फॉरेन्सिक ऑडिट केले. १२ जून २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अहवालात जवळपास पाच कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला.

तपासात प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांवरही एजन्सींना कमिशन अदा केल्याचे तसेच, एकाच विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक प्रवेश सल्लागारांशी मॅपिंग करून दुहेरी बिले काढत १ कोटी ८ लाख ५० हजार रुपयांचे अतिरिक्त कमिशन वाटप केल्याचे समोर आले. याशिवाय, बायोमेट्रिक उपस्थिती नसतानाही कर्मचारी आणि प्राध्यापकांची बनावट वेतनपत्रके तयार करून त्यांना पूर्ण वेतन मंजूर करण्यात आले. या प्रकारातून संस्थेच्या निधीतून ३ कोटी २७ लाख ८४ हजार रुपये बेकायदा वितरित करण्यात आल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, संस्थेच्या शैक्षणिक सहलींसाठी नियुक्त ट्रॅव्हल एजन्सीमार्फत प्रत्यक्ष खर्चापेक्षा जास्त रकमेची बिले सादर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप आहे. आरोपीच्या वैयक्तिक आयसीआयसीआय बँक खात्यात संबंधितांकडून ४२ लाख ३५ हजार रुपये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच, व्हिजिटिंग फॅकल्टीला ११ लाख ६९ हजार रुपयांचे अतिरिक्त मानधन मंजूर करणे आणि गोवा फ्रेशर्स टूरमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक नोंदवून ३१ लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

संस्थेमध्ये अंतर्गत चौकशी सुरू झाल्यानंतर आरोपीने वापरातील अधिकृत लॅपटॉप फॉरमॅट करून त्यातील गोपनीय माहिती स्वतंत्र हार्डडिस्कमध्ये कॉपी केल्याचा आरोप आहे. तसेच, अधिकृत ई-मेलवरील संवेदनशील माहिती स्वतःच्या वैयक्तिक ई-मेलवर पाठवून डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, शनिवार (दि. ४) आरोपीवर चौकशीअंती भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT