Khadakwasla Dam Pudhari
पुणे

CWPRS Pune Water Reservoir Facility: भारतात प्रथमच ९ मीटर उंचीची जलसाठा सुविधा; पुण्यातील सीडब्ल्यूपीआरएसची मोठी कामगिरी

दिबांगसह देशातील महाकाय जलविद्युत प्रकल्पांच्या भौतिक प्रारूप चाचण्यांचा मार्ग मोकळा; परदेशी सुविधांवरील अवलंबित्व कमी होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशातील सर्वांत मोठ्या जलविद्युत प्रकल्पांच्या तांत्रिक अभ्यासासाठी आता परदेशी सुविधांवर किंवा स्वतंत्र यंत्रणेवर अवलंबून राहण्याचे दिवस संपल्याचे अरुणाचल प्रदेशातील महत्त्वाकांक्षी दिबांग प्रकल्पाच्या निमित्ताने समोर आले आहे.

पुण्यातील खडकवासला येथील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राने (सीडब्ल्यूपीआरएस) नऊ मीटर उंचीची अत्याधुनिक जलसाठा सुविधा उभारून देशात प्रथमच उभारण्यात आलेल्या या सुविधेमुळे मोठ्या धरणांच्या भौतिक प्रारूप चाचण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर भविष्यातील जलविद्युत प्रकल्पांच्या अभ्यासाला आणि बांधकामाच्या नियोजनाला याच धर्तीवर गती मिळणार आहे.

दिबांग प्रकल्पाच्या डिझाइन आणि बांधकाम पर्यवेक्षणाची जबाबदारी इटलीची अभियांत्रिकी कंपनी स्टुडिओ पिएत्रांजेली आणि एसएमईसी यांच्या संयुक्त उपक्रमाकडे आहे. या प्रकल्पाचे गणितीय प्रारूप (मॅथेमॅटिकल मॉडेल) तयार करण्यात आले होते. मात्र, त्यातून मिळालेल्या निष्कर्षांच्या अचूकतेबाबत खात्री करण्यासाठी प्रत्यक्ष भौतिक प्रारूपावर (फिजिकल मॉडेल) अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी संबंधित संयुक्त उपक्रमाने ‘सीडब्ल्यूपीआरएस’शी संपर्क साधला.

मात्र, यापूर्वी भारतात एवढ्या मोठ्या क्षमतेचे धरण उभारले गेले नसल्याने अशा प्रकारच्या अभ्यासासाठी आवश्यक सुविधा ‘सीडब्ल्यूपीआरएस’कडेही उपलब्ध नव्हती. त्यामुळे संस्थेने स्वतंत्रपणे ही सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नऊ मीटर उंचीचा वॉटर रिझर्व्हर उभारण्यात आला आहे. या सुविधेचे उद्घाटन केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले, अशी माहिती ‘सीडब्ल्यू पीआरएस’चे संचालक सेल्वा बालन यांनी दिली.

या सुविधेचा उपयोग केवळ दिबांग प्रकल्पापुरता मर्यादित राहणार नाही. अरुणाचल प्रदेशातील प्रस्तावित कमला यांसारख्या मोठ्या जलविद्युत प्रकल्पांच्या फिजिकल मॉडेल स्टडीसाठीही तिचा वापर करता येईल. प्रत्येक नव्या प्रकल्पासाठी स्वतंत्र सुविधा उभारण्याची आवश्यकता राहणार नसल्याने अभ्यासाचे काम तातडीने सुरू करता येईल. परिणामी, बांधकामाच्या नियोजनासाठी लागणारा कालावधी नक्कीच कमी होईल.
सेल्वा बालन, संचालक, सीडब्ल्यूपीआरएस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT