पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या तुलनेत कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे केवळ शासकीय मेडिकल कॉलेजमधीलच नाही तर खासगी मेडिकल कॉलेजमधील प्रवेशाचा कट ऑफ चांगलाच घसरणार आहे. यंदा फिजिक्स विषयाचा पेपर विद्यार्थ्यांना फारच अवघड गेला होता. त्यामुळे निकाल घसरला असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
नीट परीक्षेसाठी गेल्यावर्षी 2024 मध्ये 24 लाख 6 हजार 79 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यंदा 22 लाख 76 हजार 69 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यामुळे यंदा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल दोन लाखाहून अधिक घट झाली. (Latest Pune News)
यावर्षी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 9 लाख 65 हजार 996 विद्यार्थ्यांनी तर 12 लाख 71 हजार 896 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र मुलांची संख्या 5 लाख 14 हजार 63 एवढी असून पात्र मुलींची संख्या 7 लाख 22 हजार 462 एवढी आहे. नीट परीक्षेत यंदा एकूण 12,36,531 विद्यार्थी पात्र झाले आहेत.
नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रातून प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. 2024 मध्ये तब्बल 2 लाख 82 हजार 51 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 1 लाख 42 हजार 829 विद्यार्थी पात्र झाले होते तर 2025 मध्ये नीट परीक्षेसाठी 2 लाख 48 हजार 202 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
त्यातील एक लाख 25 हजार 727 विद्यार्थी पात्र झाले आहेत. नीट परीक्षेत राजस्थान येथील महेश कुमार या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचा रँक पटकावला असून मध्य प्रदेशातील उत्कर्ष अवधीया याने दुसरा रँक तर महाराष्ट्रातील कृष्णांक जोशी या विद्यार्थ्याने देशात तिसरा रँक पटकावला आहे. महाराष्ट्रातीलच आरव अग्रवाल यांने देशातील शंभर विद्यार्थ्यांच्या यादीत दहावा तर उमेद खान या विद्यार्थ्याने 21 वा रँक मिळवला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सिद्धी बढे हिने 26 वातर ऊर्जा शहा हिने 31 वा रँक पटकावला आहे.
नीट परीक्षेत 651 ते 686 पर्यंत गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ 73 आहे. तर 601 ते 650 दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थी 1 हजार 259 एवढेच आहेत. त्याचप्रमाणे 551 ते 600 च्या दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थ्यांची संख्या 10 हजार 658 एवढी आहे. 502 पेक्षा जास्त गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांची रँक 50 हजारापर्यंत आहे.
प्रवेशाचा कटऑफ सुमारे 135 ते 150 गुणांनी खाली येणार
नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा एमबीबीएस प्रवेशाचा कटऑफ सुमारे 135 ते 150 गुणांनी घसरणार आहे. यंदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा कट- ऑफ 495 ते 505 पर्यंत असू शकतो तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशाचा कट-ऑफ 450 ते 490 पर्यंत जाऊ शकतो.
देशातील केवळ 73 विद्यार्थ्यांना नीट 2025 परीक्षेत 650 पेक्षा जास्त गुण मिळाले असून 2024 मध्ये 650 पेक्षा जास्त गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या 30 हजार 200 एवढी होती. तर यंदा केवळ 1 हजार 259 विद्यार्थ्यांना 600 गुणांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
मागील वर्षी तब्बल 79 हजार 500 विद्यार्थ्यांना 600 पेक्षा अधिक गुण मिळाले होते. त्याचप्रमाणे यंदा 500 पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 51 हजार असून मागील वर्षी हीच संख्या 2 लाख 9 हजार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.