पुणे: बँकॉक येथून पुणे आंतरराष्ट्रीय विमानळावर उतरलेल्या गुजरात येथील दोघांना सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) इंटेलिजन्स विभागाने बेकायदा हायड्रोपोनिक गांजाची तस्करी केल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या. दोघांकडून या वेळी 2 किलोहून अधिक हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 2 कोटींहून अधिक असल्याचे कस्टम विभागातील सूत्रांनी सांगितले.
कस्टम विभागाने मोहम्मद शेख (वय 57) आणि शबाना सय्यद फैझल सय्यद (वय 44) या दोघांना पुणे विमानतळावर ताब्यात घेतले. हे दोघेही गुजरातमधील सुरत शहराचे रहिवासी आहेत. ही कारवाई 7 ऑगस्टच्या संध्याकाळी करण्यात आली. (Latest Pune News)
हे दोघे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटने बँकॉकहून पुणे विमानतळावर आले होते. ही फ्लाइट सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी आली. या दोघांनी घाईघाईने विमानतळाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कस्टम विभागाच्या गुप्तचर विभाग पथकाला आधीच याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार दोघेही विमानतळावर उतरताच बाहेर पडण्याच्या अगोदर दोघांची कसून तपासणी करण्यात आली. मोहम्मद युनूस यांच्या ‘मास्टर’ ब्रँडच्या निळ्या रंगाच्या ट्रॉलीबॅगेत आणि शबाना सय्यद यांच्या लाल व काळ्या रंगाच्या बॅगेत सखोल तपासणी केली असता त्यामध्ये लपवून ठेवलेला हायड्रोपोनिक गांजा सापडला.
फन्यायालयाने पाठविले न्यायालयीन कोठडीत
पकडण्यात आल्यानंतर या दोन आरोपींना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. कस्टम विभागाने एनडीपीएस कायद्यांतर्गत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. विशेष सरकारी वकील ऋषिराज वाळवेकर यांनी युक्तिवाद करीत आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची मागणी केली. न्यायालयाने दोघांची येरवडा कारागृहात रवानगी केली केली.
काय म्हणाले सरकारी वकील?
हे एक सुनियोजित तस्करीचे प्रकरण आहे व अधिक चौकशी आवश्यक आहे. आरोपींचे बँकॉकमधील संपर्क, ड्रगची डिलिव्हरी कुठे होणार होती, यामध्ये अजून कोणी सहभागी आहे का, या तपासात आरोपींचा मोबाईल डेटा, बँक व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचीही तपासणी याबाबत अॅड. वाळवेकर यांनी न्यायालयाला तपास होण्याकामी माहिती दिली.