पुणे

सलग सुटीमुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

अमृता चौगुले

लोणावळा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शनिवार, रविवारचा विकेंड अन् लगेच मंगळवारी स्वातंत्र्य दिन व बुधवारी पतेती अशा जोडून आलेल्या सलग सुटीचे निमित्त साधून वर्षाविहार व निसर्गरम्यस्थळी सहकुटुंब फेरफटका मारण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळा, खंडाळ्यासह मावळातील सर्वच पर्यटन स्थळांवर दाखल झाले होते. पर्यटकांची पंढरी म्हणून संबोधल्या जाणार्‍या भुशी धरणावर तर पर्यटकांची रांगच लागली होती. त्यामुळे एरवी नजरेस पडणार्‍या, धरणाच्या भिंतीच्या पायर्‍यांवरून फेसाळत वाहणार्‍या पाण्याऐवजी माणसांची मतुडुंबफ गर्दी दिसून येत होती.

गेल्या काही वर्षापासून लोणावळा, खंडाळा आणि मावळातील पर्यटन स्थळांवर पर्यटन आणि वर्षाविहाराचा स्वातंत्र्यदिनी आनंद लुटण्यासाठीची नवी क्रेज पर्यटकांमध्ये निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस पर्यटकांमध्ये पर्यटनाचे आकर्षण वाढले आहे. मुंबई, ठाणे व पुण्यातील पर्यटकांसह देश, विदेशातील पर्यटक लोणावळा, खंडाळा आणि मावळातील विविध पर्यटन व धार्मिकस्थळांना भेटी देतात. त्यातच सलग सुट्यांचा योग जुळून आला तर मात्र येथे येणार्‍या पर्यटकांमध्ये एक वेगळेच चैतन्य आणि उत्साह संचारलेला दिसतो. कामगार, नोकरदार वर्गासह अनेकजण या सलग सुट्यांचे योग साधत कुटुंब व मित्रांसमवेत पर्यटन आणि वर्षाविहाराच्या पिकनिकसाठी लोणावळा गाठतात. त्यातही भुशी धरण हे आकर्षणाचे केंद्रबिंदू राहते.

पर्यटन स्थळे गजबजली…

मंगळवारी स्वातंत्र्यदिनी भुशी डॅमच्या सांडव्यावरून वाहणार्‍या पाण्यात भिजण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. भुशी डॅमसह लोणावळ्यातील टायगर पॉईंट, लायन्स, शिवलिंग, राजमाची पाँईट, गिधाड तलाव व धबधबा तसेच कार्ला, भाजे, बेडसे लेणी व पवनाधरण, तुंगार्ली, लोणावळा, वलवन, शिरोता आणि उकसान या धरण परिसरासह लोहगड, विसापूर, कोराईगड, राजमाची, तुंग, तिकोना हे गड किल्ले आणि आंदर व नाणे मावळातील पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने गजबजले होते. अनेकांच्या अंगावर व चेहर्‍यावर तिरंग्याचे चित्र पहायला मिळाले. तर अनेकजण रस्त्याने ये-जा करताना व पर्यटनस्थळावर वंदे मातरम, भारत माता की जय ! जयघोष करीत होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT