जुन्नरच्या पर्यटनस्थळांवर वाढली हुल्लडबाजी; अपघातांची शक्यता वाढली Pudhari
पुणे

Junnar Tourism: जुन्नरच्या पर्यटनस्थळांवर वाढली हुल्लडबाजी; अपघातांची शक्यता वाढली

पर्यटकांचे रील्स, सेल्फीसाठी ‘काहीही’;

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: जुन्नर तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने येथे ठिकठिकाणी धबधबे ओसंडून वाहताना दिसतात. येथील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातील बहुतांश पर्यटक हे हुल्लडबाजी करताना दिसतात.

रील्स आणि सेल्फीच्या नादात अनेकदा ते धोक्याची मर्यादा ओलांडत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे अपघात वाढण्याची शक्यता वाढली असून, त्याकडे प्रशासनाकडे लक्ष घालण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. (Latest Pune News)

येथे येणारे अनेक पर्यटक धबधब्याकडे जाण्यासाठी निसरड्या पायवाटेचा वापर करतात. हौशी पर्यटक खडकाच्या टोकावर उभे राहून सेल्फी घेतात. रेलिंग लावलेले असतानाही काही जण ते ओलांडून कड्याच्या टोकावर उभे राहून फोटो किंवा व्हिडिओ काढतात. त्यातच अनेक जण मद्यपान करून कठडे ओलांडतात. पावसाचा आनंद लुटताना अनेक पर्यटक बेपर्वा झाल्याचे दिसतात. त्यामुळे पर्यटनाच्या नावाखाली परिसरात हुल्लडबाजी वाढल्याचे दिसून येते.

गेल्या आठ दिवसांपासून सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विविध भागांत डोंगरमाथ्यावरील पाण्याचे जोरदार प्रवाह चालू झाले आहेत. रंधाफॉल, न्हाणीफॉल अशा ठिकाणी तरुण-तरुणींची जीव धोक्यात घालून हुल्लडबाजी सुरू असते.

पर्यटन तालुका जुन्नरचा विचार केला तर प्रामुख्याने माळशेज घाट, अंबोलीघाट, नाणेघाट, दार्‍या घाट, मुंजाबा डोंगर, (धुरनळी धबधबा), हरिश्चंद्रगड, लागाचा घाट, फोफसंडी अशा अनेक धोकादायक ठिकाणी निसर्गाने सौंदर्याची पुरेपूर उधळण केल्याचे दिसून येते. अहिल्यानगर जिल्ह्यात भंडारदरा, कळसूबाई, हरिश्चंद्रगड, सांदनदरी अशी अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांचे आकर्षण झाले आहे.

धिंगाण्याचा स्थानिकांना त्रास

पावसाळ्यात पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांमध्ये नवतरुणांचा भरणा अधिकचा आहे. तसेच कार्पोरेट कंपन्यांतील तरुण- तरुणी एकत्र पर्यटनाला येत असतात. त्यांच्याकडून रस्त्यांवर वाहने बेशिस्तपणे लावणे, आडवी वाहने लावून मोठ्या आवाजात गाणी वाजवणे, वाहनात बसून मद्यपान करणे, जोरजोरात हॉर्न वाजवणे, शिट्ट्या मारणे, विनाकारण ओरडणे, प्रवासी वाहनांकडे पाहून विक्षिप्त हातवारे करणे, धबधब्याला चिकटून उभे राहून सेल्फी काढणे, त्यांना कोणी सूचना केल्यास वाद घालणे, मारहाण करणे असे प्रकार वाढले आहेत. या लोकांमुळे शिस्तबद्ध पर्यटकांसह स्थानिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

सूचनाफलकांकडे दुर्लक्ष

तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळी शासनाने व पोलिस प्रशासनाने पर्यटकांना मार्गदर्शक ठरतील असे अनेक फलक लावलेले आहेत. त्याकडे मात्र पर्यटक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हुल्लडबाजी करणार्‍या पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. माळशेज घाट हा ठाणे व पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर विखुरला आहे. येथे मुरबाड पोलिस व ओतूर पोलिस येथील पर्यटकांवर नजर ठेवून आहेत.

थ्रिलसाठी धोका पत्करला जातो

भंडारदरा येथे काही तरुण दोन्ही हात सोडून दुचाकी भरधाव चालवून त्याचा व्हिडिओ घेताना कित्येकांनी पाहिले. तर काही मुले ट्रिपल सिट गाडीवर बसून स्टंटबाजी करीत होते. या प्रकारांत मुलीही काही कमी नाहीत, असे निदर्शनास येते. हे सगळे धोकादायक असतानाही केवळ काहीतरीथ्रिल करण्यासाठी हे तरुण धोका पत्करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. असे फोटो किंवा व्हिडिओ काढून ते स्टेटसला ठेवण्याची स्पर्धाही लागली की काय, असाही प्रश्न सोशल मीडिया पाहून पडतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT