आळेफाटा: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात गुरुवारी (दि. 25) भरलेल्या संकरित गायींच्या आठवडे बाजारात पशुपालक शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 393 गायी विक्रीसाठी आल्या होत्या, त्यापैकी 363 गायींची विक्री झाल्याने या उपबाजारात 80 लाखांपेक्षा अधिकची आर्थिक उलाढाल झाली.
यावर्षी उन्हाळ्यातील चारा व पाणीटंचाई, पशुखाद्यांच्या वाढलेल्या किंमती व दुधाचे कमी झालेले दर याच्या झळा या उपबाजारातील संकरित गायींचे आठवडे बाजारास बसल्या होत्या. यानंतर मे व जून महिन्यातील मोसमीपूर्व जोरदार झालेले पाऊस यामुळे चारा व पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाल्याने या बाजारातील रोडावलेल्या खरेदीच्या व्यवहारात वाढ झाली. (Latest Pune News)
परंतु, त्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याचा परिणाम या बाजारातील संकरित गायींच्या खरेदीवर झाला. नुकताच जोरदार पाऊस झाल्याने या उपबाजारातील चित्र पालटण्यास मदत झाली. यामुळे गुरुवारी भरलेल्या संकरित गायींच्या बाजारात पशुपालक शेतकऱ्यांचा खरेदीस चांगला प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यात चांगल्या प्रतीच्या संकरित गायी मिळण्यास आळेफाटा येथील आठवडे बाजार प्रसिद्ध आहे. तेजी-मंदीचा सामना करीत आजही संकरित गायींचा बाजार टिकून आहे. येथे चांगला प्रतीच्या दुधाळ गायी मिळत असल्याने आजच्या उपबाजारात पुणे जिल्ह्यासह शेजारील अहिल्यानगर, ठाणे या जिल्ह्यांतील व मराठवाड्यातील शेतकरी येथे आवर्जून खरेदीस आले होते.
आळेफाटा येथील आठवडे बाजारात गायींची प्रतवारीनुसार 10 ते 80 हजार रुपयांवर विक्री झाली असल्याची माहिती सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे आणि कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.