आळेफाटा: पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण आणि सुरू असलेले सिमेंट काँक्रिटीकरण तसेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक आळेफाटा मार्गे वळवल्याने गुरुवारी (दि. 25) सकाळी 11 वाजल्यानंतर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आळेखिंड परिसरात तब्बल दीड तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
सध्या आळेखिंड परिसरात नाशिककडील बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असल्याने वाहतूक एका बाजूनेच सुरू आहे. त्यातच अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील वाहनांची वळवलेली गर्दी मिळून कोंडीची समस्या अधिक तीव झाली आहे. याआधी रविवारी (दि. 14) देखील आळेफाटा व आळेखिंड परिसरात संध्याकाळी झालेली वाहतूक कोंडी पहाटेपर्यंत सुटली होती. (Latest Pune News)
दरम्यान, गुरुवारी पुन्हा सकाळी 11 वाजता वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे महामार्गावर लांबलचक वाहनंच्या रांगा लागल्या होत्या. अखेर आळेफाटा पोलिस व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून दीड तासानंतर वाहतूक सुरळीत केली.आळेखिंड परिसरातील वारंवार होणाऱ्या या कोंडीमुळे प्रवासी व वाहनचालक त्रस्त झाले असून, तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.