पुणे: राज्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता बहुतांश खरीप पिकांवर आता कीड व रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. याबाबत कृषी विभागाकडून शेतकर्यांमध्ये जागृती करण्यात येत असून, उपाययोजनाही सुचविल्या जात आहेत. तरीही खरीप नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून दिलेल्या आहेत. तरीसुद्धा पिकांच्या उत्पादनात घटही अपेक्षित असल्यामुळे शेतकर्यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
राज्यात गेल्या आठवडाअखेर बहुतांश विभागांत आकाश ढगाळ राहिले. कोकण विभागात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या, तर तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. (Latest Pune News)
पुणे व कोल्हापूर वगळता काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या, तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर व लातूर विभागात तुरळक ठिकाणी हलका, मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. अमरावती व नागपूर विभागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची नोंद झाली.
राज्यात काही ठिकाणी मका व खरीप ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. भातपिकावर पिवळ्या खोडकिडीचा व करपा रोग, तर सोयाबीनवर हेलीकोव्हर्पा, पाने खाणार्या अळीचा, चक्री भुंगा, उंट अळीचा प्रादुर्भाव आहे. मूग पिकावर पाने खाणार्या अळीचा, उडीद पिकावर तुडतुडे, खोडमाशीचा तसेच मर व भुरी रोगही दिसून येत आहे.
भुईमूग पिकावर हुमणी, केसाळ अळी, कापूस पिकावर तंबाखूवरील पाने खाणारी अळी व मावा व तुडतुडे या किडींचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे. कीडरोग व्यवस्थापनासाठी क्षेत्रीय स्तरावर शेतीशाळा, कृषी विद्यापीठांकडील पीकसंरक्षण सल्ले, सर्वेक्षणासाठी फेरोमेन सापळे तसेच कीटकनाशकांच्या वापराबाबतच्या सूचना देऊन उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच, कीडरोग नियंत्रणासाठी शेतकर्यांमध्ये जागृतीही करण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या ताज्या अहवालात नमूद केले आहे.