

पुणे: राज्यात सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाच्या अंतिम फेरीत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी शनिवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. यात वाढ करून मंगळवारपर्यंत (दि. 2 सप्टेंबर) मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी- पालक आणि महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 535 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 15 हजार 165 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 44 हजार 67 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 59 हजार 232 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 14 लाख 79 हजार 654 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. (Latest Pune News)
त्यापैकी 11 लाख 44 हजार 583 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर 1 लाख 67 हजार 78 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अशा 13 लाख 11 हजार 661 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता प्रवेशासाठी अद्यापही 6 लाख 70 हजार 582 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 1 लाख 76 हजार 989 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 8 लाख 47 हजार 571 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अंतिम फेरीत 35 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश
ओपन टू ऑल विशेष फेरीमध्ये शुक्रवारी (दि. 29) कला शाखा 1 लाख 09 हजार 747, वाणिज्य शाखा 19 हजार 719 आणि विज्ञान शाखेसाठी 16 हजार 387 असे एकूण 3 लाख 88 हजार 053 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. त्यापैकी 35 हजार 439 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केला आहे. त्यात कॅप फेरीसाठी 32 हजार 770, तर कोटा अंतर्गत 2 हजार 669 प्रवेश झाले आहेत.