

पुणे: मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल सर्वपक्षीय आमदार-खासदार उघडपणे भूमिका घेत आहेत. सरकारने आणि ज्या लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षण मोर्चाचे नेते मनोज जरांगे यांना भेटून पाठिंबा दिला आहे, त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.
अन्यथा या लोकप्रतिनिधींवर आम्ही बहिष्कार टाकू,” असा इशारा त्यांनी दिला आहे. शनिवारी झालेल्या ओबीसी एकजूट बैठकीनंतर पत्रकार परिषदेत हाके बोलत होते. यावेळी ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. (Latest Pune News)
हाके म्हणाले, ”राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्टपणे जाहीर करावे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांमुळे सरकारकडून सतत हालचाली सुरू आहेत; मात्र ओबीसींच्या आरक्षणावर गदा येईल, अशी भीती आम्हाला वाटते. सरकारने पुढील दोन दिवसांत स्पष्ट भूमिका मांडावी.
जर तसे झाले नाही, तर आम्ही राज्यातून संघर्ष यात्रा सुरू करणार आहोत. ही यात्रा तालुका-तालुक्यातून काढून शेवटी मुंबईत पोहोचवली जाईल. कुठून सुरू करायची आणि कधी सुरू करायची, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.
सरकार जर खरंच ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवत असेल, तर मग मराठा समाजाला आरक्षण कसे देणार, याचे उत्तरत्यांनी द्यावे. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना न्याय मिळेल का, हा प्रश्न उपस्थित राहील. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठीच हा एल्गार उभारला आहे.