बापू जाधव
निमोणे: शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण धोक्याच्या पातळीवर पोहचले आहे. सातत्याने गावठी कट्टे कंबरेला लावून फिरणारे गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागत आहेत.
कट्टा बाळगणे आता जणू काही साधे प्रकरण झाले असून, ही शस्त्रे इतकी सहज उपलब्ध कशी होतात? हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. मात्र, या प्रश्नाच्या मुळाशी पोलिस यंत्रणा व तपास यंत्रणा का पोहचत नाही, हे अद्यापही कोडे आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत परप्रांतीय गुन्हेगारांचा वावर झपाट्याने वाढत आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानातील नामचीन गुन्हेगार टोळ्या येथे बस्तान बसवू लागल्या आहेत. (Latest Pune News)
त्यांना विदर्भ, मराठवाडा, खान्देश, मुंबई परिसरातील स्थानिक गुंडांचा हातभार मिळतो आहे. स्थानिक आणि परप्रांतीय टोळ्यांच्या या युतीमुळे शिरूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळू लागली आहे.
कष्टकरी कामगारांच्या आडून गुन्हेगारी
औद्योगिक वसाहतीत कष्टकरी कामगारांच्या गर्दीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मिसळलेले दिसतात. या प्रवृत्तीला स्थानिक समाजात हळूहळू मान्यता मिळू लागली आहे. मागील दोन-तीन दशकांत भंगार, वाहतूक, ठेके यांतून गडगंज पैसा कमावलेले काही स्थानिक लोक आता गुन्हेगारी मार्ग अवलंबणार्या नव्या पिढीला आदर्श वाटू लागले आहेत. त्यांनी एवढ्या कमी कालावधीत गडगंज माया कमावली तर आपण का कमावू शकत नाही,असे युवकांना वाटत असल्याने आपसूकच ते गुन्हेगारीकडे वळू लागले आहेत.
गंभीर गुन्ह्यांतून समाजात उघड वावर
अपहरण, खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, ब्लॅकमेलिंग, वाटमारी आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेले गुन्हेगार समाजात उघडपणे वावरतात. अनेकदा समाजमान्यताही मिळवतात. त्यामुळे तरुण पोरं गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होतात. पोलिस दफ्तरातील नामचीन गुन्हेगार नव्या टोळ्यांशी हातमिळवणी करून कायदा व सुव्यवस्थेला उघड आव्हान देत आहेत.
खाकीच्या धाकाला तडा
पूर्वी पोलिस ठाण्याच्या पायरीवर उभा असताना मान खाली घालणारा गुन्हेगार आज पोलिसांसमोर छाती ताणून वावरतो, हे खाकीच्या धाकाला तडा गेल्याचे निदर्शक आहे. पोलिस यंत्रणेने याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. एकूणच, रांजणगाव औद्योगिक वसाहत नव्हे तर शिरूर तालुक्यात गुन्हेगारीचे बस्तान दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहे. कायद्याचे राज्य टिकविण्यासाठी या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करणे ही पोलिस यंत्रणेची नैतिक जबाबदारी आहे; अन्यथा निर्भयतेऐवजी दहशतीला समाजमान्यता मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जामिनावर बाहेर येणार्या गुन्हेगारांचे धाडस
पोलिसांनी पकडलं तरी 15 दिवसांत जामीन मिळतोच, ही मानसिकता गुन्हेगारांच्या मुळाशी बसली आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या परिणामांची भीती उरलेली नाही. शिवाय, तुला सोडवायचं काम आम्ही पाहतो, असे बळ देणारे झारीतले शुक्राचार्य देखील गुन्हेगारांना सापडतात. ज्यांनी कायद्याचे रक्षण करायला हवे, तेच गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तर निर्भय समाजाची अपेक्षा कशी ठेवायची? हा प्रश्न उपस्थित होतो.