पुणे

Crime News : भेसळयुक्त 34 लाखांचा साठा जप्त

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा, वनस्पती तूप आदी 34 लाख 16 हजार 490 रुपये किमतीचा भेसळयुक्त साठा जप्त केला आहे.

67 आस्थापनांना सुधारणा नोटीस

एफडीएकडून विविध खाद्यपदर्थाचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. दिवाळीसणानिमित्त घराघरात मोठ्या प्रमाणात मिठाई, तप, पनीर आदी पदार्थ पहायला मिळतात. यासंधीचा गैरफायदा घेत काही विक्रेते या पदार्थांमध्ये भेसळ करतात. त्यामुळे पुणे विभागात एफडीएकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत 123 अन्न आस्थापनेच्या तपासण्या करण्यात आल्या आणि 67 आस्थापनांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आली आहे.

तसेच, पुणे जिल्ह्यात अन्न आस्थापनेतून खवा, पनीर, मावा, गाईचे तूप आदी अन्न पदार्थांचे 142 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे पुढील कारवाई घेण्यात येईल, अशी माहिती एफडीए प्रशासनाकडून देण्यात आली.

123 दुकानांची केली तपासणी

सणासुदीच्या दिवसात मिठाई, तसेच इतर अन्न पदार्थांना विशेष मागणी असते. त्यामुळे या कालावधीत भेसळयुक्त पदार्थ विकण्याची शक्यता असते. त्यामुळे ऐन दिवाळीत एफडीएकडून विशेष मोहीम राबवून अन्न पदार्थांची तपासणी करण्यात आली. हॉटेल तसेच स्वीटहोम सारख्या आस्थापनांवर एफडीएकडून विशेष लक्ष देण्यात आले. दिवाळीच्या दिवसात तब्बल 123 अस्थापनांची तपासणी एफडीएकडून करण्यात आली.

तक्रारीसाठी या क्रमांकावर संपर्क साधा

आपल्या परिसरातील दुकानांमधून विक्री होणार्‍या अन्न पदार्थामध्ये भेसळ संदर्भात काही संशय असल्यास जागरूक नागरिकांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा, असे आवाहन एफडीए पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT